एटीएम दरोडाप्रकरणी चौघांना अटक
कोल्हापूर :
कोवाड (ता. चंदगड) येथील एका बॅँकेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकून एटीएम मशिन फोडून 18 लाख 77 हजारांची रोकड चोरली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजस्थानमधील चौघा दरोडेखोरांना अटक केली. गुह्यात वापरलेल्या चारचाकी कारच्या नंबरवरुन पोलिसांनी या गुह्याचा छडा लावला.
तस्लीम इसा खान (वय 20), अलीशेर जमालू खान (वय 29), तालीम पप्पू खान (वय 28), अक्रम शाबू खान (वय 25 चौघे रा. छोटे मश्जीदजवळ, सामदिका, ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दरोड्यातील रोकड त्यांनी मित्र इस्माईल, अकबर, सलीम (संपूर्ण नाव पत्ता समजला नाही) यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्या संशयितांचाही शोध सुऊ केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोवाड येथे एसबीआय बॅँकेची शाखा आहे. येथेच एटीएम सेंटरही सुऊ केले आहे. या सेंटरवर 5 जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून त्यातील 18 लाख 77 हजार 390 रुपये रोख कॅशबॉक्ससह चारचाकीमधून चोऊन नेली होते. याची माहिती समजताच पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. यावेळी चोरट्यांनी पोलिसांच्या गाडीला धडक देऊन पळ काढला. दरम्यान त्यांची कार मध्येच बंद पडल्याने ती रस्त्यावर सोडून चोरीची रक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला. पोलिसांनी ती कार जप्त केली. त्याच्या नंबरवऊन मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नंबरप्लेट बनावट असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कारच्या चेस व इंजिन नंबरवरून कारचा मूळ नंबर आणि मालकाचा शोधला घेतला. त्यावेळी सामदिका (ता. पहाडी, राज्यस्थान) येथील सद्दाम खान याच्या नावावर ही कार असल्याचे समजल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर तपास गतिमान करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे तपास पथक त्वरित राजस्थानकडे रवाना झाले. या पथकाने कार मालक सद्दाम खानचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीत ती कार त्याचा मित्र तस्लीम खानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगून घेऊन गेल्याचे सांगितले. तसेच कार घेवून गेल्यापासून त्याचा संपर्क झाला नसल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान संशयित तस्लीम खान व त्याचे मित्र पालघर जिह्यातील मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील मनोर गावातील सहारा मेवात धाबा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावऊन त्या ठिकाणी धाव घेऊन, तस्लीम इसा खानसह त्याचे साथिदार अलीशेर जमालू खान, तालीम पप्पू खान, अक्रम शाबू खान यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर, चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार दीपक घोरपडे, अमित सर्जे, महेश पाटील, राजू कांबळे, प्रशांक कांबळे, समीर कांबळे, हंबीर अतिग्रे, अनिल जाधव, नामदेव यादव, राजेंद्र पताडे, रामकुमार माने आदींनी केला.