सराफाच्या कारखान्यावर दरोडा टाकणारे चौघे जेरबंद
सातारा, वाई :
वाई शहरातील व्यापारी पेठेत सोन्या चांदीच्या कारखान्यात दि. 28 जुलै 2024 रोजी पिस्टल आणि कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेला तब्बल सहा महिने उलटले असतानाच वाई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठत या गुह्याची उकल केली आहे. दरोडेखोरांनी कारखान्यावर दरोडा टाकण्याचा प्लॅन एक महिन्यापासून आखला होता. वाई शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चकवा दिला परंतु त्याच कॅमेऱ्यांनी त्या चोरट्यांचा घात केला. चोरीमध्ये वापरलेली दुचाकी ही चोरीची होती. ती कोकणात बेवारस स्थितीत आढळून आली तर चोरी केलेले सोने परराज्यात विक्री केले होते. चारही चोरट्यांकडून वाई पोलिसांनी 4 लाख 15 हजार 152 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाई शहरात सराफ बाजारात सोन्या, चांदीचे दागिने बनवण्याचा कारखान्यामध्ये दि. 28 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चार कामगार काम करत होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगीही होती. त्याचवेळी दोन जणांची अचानक एंट्री होते. त्यातील एकाच्या हातात कोयता तर दुसऱ्याच्या हातात पिस्टल होता. दोघांनीही बुरखा घातला होता. त्यामुळे काही कळायच्या आत त्यांनी कोयता अन् पिस्टलचा धाक दाखवून कारखान्यातील सोन्या, चांदीचे दागिने लुटून नेले होते.
त्याबाबतची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र, हा गुन्हा उघडकीस येईल की नाही याबाबत वाईकरांच्यामध्ये सुद्धा उत्कंठा होती. कारण एवढे मोठे धाडस झाल्यानंतर चोरटे हे फक्त कारखान्याच्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. शहरातल्या कुठल्याच सीसीटीव्हीत दिसले नव्हते. पोलीस शोध घेत होते. पोलिसांना यश येत नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देवून गुह्यांना ब्रेक लावा अशी विनंती केली होती. त्यावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्वत: वाईत भेट देवून व्यापाऱ्यांची बैठक घेवुन त्यांच्याशी चर्चाही केली होती. असे असतानाच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वसुई येथील माणिकपूर पोलिसांनी दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला. त्या गुह्यातील संशयित अनुज गंगाराम चौगुले, रॉय उर्फ रॉयल एडव्हर्ड सिक्वेरा दोघे (रा. नालासोपारा वसई) यांनी माणिकपूर पोलिसांना वाईत जबरी चोरी केल्याची कबुली दिली आणि तब्बल सहा महिन्यांनी गुह्याची वाचा फुटली. वाई पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाणे गाठले. त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली तेव्हा आणखी त्यातल्या बाबी उजेडात आल्या. त्या म्हणजे वाई येथील बापट बोळातच ज्याचे कापड दुकान आहे तो व्यापारी सुधीर गणपत शिंदे हाच त्यांना सहाय्य असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत वाई तालुक्यातील सिताराम चोरट हाही सोबत होता. त्या तिघांना सुधीर शिंदे याने वाईतील ज्वेलरीचा परिसर दाखवला. सर्व माहिती दिली. त्यात संजय माईती आणि मृत्यूंजय माईती या दोघांचे कारखाने दाखवले. कोणत्या वेळेत कारखाने सुरु असतात, जाण्यायेण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही आहे की नाही याची माहिती पुरवली.
जुन महिन्यात कट रचून अनुज चौगुले आणि रॉयल सिक्वेरा यांनी स्वारगेट येथून निळया रंगाची बजाज अव्हेंजर गाडी चोरी केली. त्या गाडीला कोल्हापुरात नेवून तेथे काळा रंग दिला आणि ती गाडी घेवून शहाबाग फाट्यावर येवून दोघे थांबले. सिताराम चोरट याच्या फोनची वाट पाहिली. चोरट याने फोन करताच ते दोघे वाई शहरात गेले. त्यांनी दाखवलेल्या कारखान्यात शिरुन कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने पिशवीत भरुन जिथून सीसीटीव्ही नाही त्याच ठिकाणाहून बाहेर पडत दुचाकीने भोर मागे महाडला पोहचले. महाड येथून नागोठाणे येथे ती गाडी सोडून चोरी केलेले दागिने त्यांनी कोईमतुर(राज्य तामिळनाडू), वसई येथे विकले. त्यांच्याकडून चोरीच्या गुह्यातील 4 लाख 15 हजार 152 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्या चौघांना वाई न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे डीवायएसपी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगावकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज, हवालदार अजित जाधव, पो. कॉ. प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ. राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, विशाल शिंदे, गोरख दाभाडे, धीरज नेवसे, स्नेहल सोनावणे यांनी केली आहे.
- चोरी केल्याच्या दिवशी दारु पार्टी शिंदेच्या दुकानात
बापट बोळात सुधीर शिंदे याचे कापड दुकान आहे. शिंदे याचे मुळगाव चांदवडी असून तो कापड व्यापारी असल्याने त्याने या चोरट्यांना सहकार्य केले. सिताराम चोरट याने सीसीटीव्ही कुठे सुरु आहेत कुठे नाहीत हे त्यांना सांगितले. चोरीच्या घटनेनंतर चौघांनी शिंदे याच्या दुकानावर रात्रीची दारु पार्टी केली. त्यानंतर त्याच्याच प्लॅटवर रात्री झोपले. सकाळी सर्व काही शांत असताना हे दोघे तेथून दुचाकी घेवून पळून गेले. मात्र, त्यांनी केलेले कृत्य हे उघडकीस आले ती सीसीटीव्हीमुळेच.