‘पीएनजी’त अफरातफर करणाऱ्या चौघांना अटक
तब्बल 6.63 कोटीची केली अफरातफर : पणजी पोलिसांकडून चौघानांही अटक
पणजी : येथील नामवंत पीएनजी सराफी दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच गेल्या दोन वर्षाच्या काळात तब्बल 6 कोटी 63 लाख ऊपयांची अफरातफर केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पीएनजीचे विक्रेता प्रमुख सुरेश कृष्णन यांनी पणजी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांच्या विरोधात भान्यासंच्या कलम 409, 420, 468, 471 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये उमेश विठ्ठले, योगेश भिडे, हरीष शिरेडकर व साहीर सय्यद यांचा समावेश आहे.
या प्रकरणात भावना नामक एका महिलेचे नावही पुढे आले असून तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. अफरातफर करणारे एक मोठे रॅकेट असून त्यात आणखी काहीजण अडकण्याची शक्यता आहे. पोलिस त्या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत. अफरातफरीचा हा प्रकार 2022 सालापासून सुऊ झाला होता. पीएनजी सराफी दुकानात ग्राहकांसाठी विविध योजना दिल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजे, ग्राहकांनी आपल्याकडील सोने ठरावीक काळासाठी त्यांच्याकडे ठेवावे. ग्राहकांनी ठेवलेल्या सोन्यासाठी त्यांना व्याज रक्कम दिली जात होती. संशयितांनी याचा फायदा घेतला आणि आपली पोळी भाजणे सुऊ केले होते.
ग्राहकांनी ठेवलेल्या सोन्याची मुदत संपली की ग्राहकांना काही कळण्या अगोदरच ते सोने आपल्या ताब्यात घ्यायचे आणि नव्या ग्राहकाला त्या सोन्याचे दागिने तयार करून द्यायचे. ते पैसे मधल्यामध्ये गडप करायचे. ज्या ग्राहकाने सोने ठरावीक काळासाठी ठेव म्हणून ठेवले होते, त्याला यातील काहीच कळत नव्हते. जेव्हा एक ग्राहक आपल्या सोन्याबाबत विचारणा करण्यासाठी आला तेव्हा त्याला कळले की त्याच्या सोने ठेवीची मुदत केव्हाच संपून गेली आहे. मात्र त्याला त्याचे सोने मिळाले नाही, योजनेचा फायदाही मिळाला नाही. त्यांनी सखोल चौकशी केली असता सारा प्रकार उघडकीस आला आणि विक्रेता प्रमुख सुरेश कृष्णन यांनी पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली.
चारहीजणांना नाद लागला होता कॅसिनोचा
या अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयितांना जुगार खेळण्याचे व्यसन जडले होते. इकडचे पैसे तिकडे करून झटपट पैसा मिळविण्याचा त्यांचा मनसूबा होता. दर दिवसाला ते कॅसिनोत लाखो ऊपये खेळायचे आणि हरायचेही. त्यांना वाटत होते की जुगारात पैसे मिळतील आणि दुकानात अफरातफर केलेले पैसे पुन्हा ठेवून सर्व गोष्टी व्यवस्थित करता येतील, मात्र त्यांना जुगारात काही पैसे मिळत नव्हते आणि ते अधिक बुडत होते. अखेर अफरातफरीचा प्रकार उघड झाला आणि संशयितांना तुऊंगाची हवा खावी लागली.