गोव्यात लवकरच सुरू होणार ‘फाऊंडेशन वन’ रक्त चाचणी
गोवा ठरणार देशातील पहिले राज्य : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : गोव्यात ‘फाऊंडेशन वन’ ही तपासणी सुरू करणार आहोत. ही तपासणी देशातील अन्य कोणत्याही राज्यातील सरकारी इस्पितळात उपलब्ध नाही. मुंबईच्या एका कंपनीकडे आम्ही याबाबत बोलणी केली आहे. सीएसआर अंतर्गत ही ‘फाऊंडेशन वन’ तपासणी गोव्यात सुरू करणार आहोत. या तपासणीचे नमुने अमेरिकेत पाठवून ऊग्णांच्या आजाराचे निदान केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मिरामार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे यांनी राज्यातील आरोग्य सेवांच्या सोयी-सुविधांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोकांच्या दारात जाऊन आम्ही सर्वांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर गावातील फिजिओथेरपी शिक्षणाची मुले असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.
राज्यातील प्रत्येक गावातील उपविभागीय आरोग्य केंद्रात 21 तऱ्हेच्या रक्त तपासणीची सोय करण्यात येणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय इंटिग्रेटेड ऊग्णवाहिका सेवा देण्याचाही विचार आरोग्य खात्याने सुरू केला आहे. ह्य्दयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढत असल्याने ऊग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी अशी सेवा असणे महत्त्वाचे आहे. कर्करोगाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खात्याने प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात कर्करोग निदानाची सोय आहे. तरीही या ठिकाणी आणखी सोयी-सुविधा पुरविण्याची गरज असेल तर त्या काही दिवसांतच पुरवल्या जातील. दोन्ही जिल्हा इस्पितळात आयसीयू सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. व्हेंटिलेटर टेक्निशियनची गरज असल्याने ती पदे वाढवून घेण्यात येतील, असे ते म्हणाले.
सर्व मतदारसंघांत महा आरोग्य शिबिरे
राज्यातील प्रत्येक मतदारसंघांत आरोग्य खात्यातर्फे महा आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. या शिबिरांतून ऊग्णांच्या आजारांबाबतची माहिती मिळवून त्या त्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी जिल्हा इस्पितळात सोय केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघात इंटिग्रेटेड मोबाईल सेवा सुरू करण्यात येईल. केअर टेकर सेवाही सुरु करण्यात येईल.