For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्तशुद्धीचा पाया

06:06 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
चित्तशुद्धीचा पाया
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

सकाम कर्मे करून पुण्यसंचय करायचा आणि त्याआधारे स्वर्गातील भोग भोगायचे. पुण्यसंचय संपला की, पुन्हा जन्म घ्यायचा. असं हे जन्ममृत्यूचं चक्र चुकीच्या विचारसरणीमुळे मनुष्य आपल्या मागे लावून घेत असतो. हे म्हणजे आपणहूनच आपल्यासाठी आपल्या हाताने लावलेल्या सापळ्यात आपण पाय ठेवल्यासारखे होते. त्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून तो ईश्वरप्राप्तीच्या दिशेने एक रेसभरही पुढे सरकू शकत नाही. अशा लोकांची दया येऊन बाप्पा त्यांच्या सुटकेचा मार्ग पुढील श्लोकात सांगत आहेत.

यस्य यद्विहितं कर्म तत्कर्तव्यं मदर्पणम् ।

Advertisement

ततो स्य कर्मबीजानामुच्छिन्ना स्युर्महाङ्कुरा: ।। 36।।

अर्थ- ज्याचे जे धर्माने विहित कर्म असेल ते त्याने मला अर्पण करावे. तेणेकरून त्याचे कर्मबीजांचे मोठे मोठे फल देणारे अंकुर तुटून जातील.

विवरण- आळसात न राहता माणसाला कर्म करायला प्रवृत्त करायचं काम वेदवचनं करतात. सुखाचा उपभोग घ्यायला चटावलेला माणूस स्वर्गसुखाची लालूच पाहून कर्म करायला प्रवृत्त होतो. अशा पध्दतीने अमुक एक गोष्ट मिळावी हा हेतू मनात धरून मनुष्य कार्यरत होतो पण पुढे त्याच्या लक्षात येते की, कार्य करून मिळवलेल्या वस्तू त्याला कायम सुखी समाधानी ठेवू शकत नाहीत. मग कायम टिकणारं सुख कशात असेल हे शोधण्याच्या दृष्टीने त्याने प्रयत्न करावेत हा वेदांचा छुपा उद्देश त्याच्या लक्षात येतो.

हा उद्देश ज्यांच्या लक्षात आलाय त्यांच्यासाठी कर्मामुळे निर्माण होणाऱ्या पाप पुण्याच्या बंधनातून सुटण्यासाठी एक युक्ती बाप्पा या श्लोकात सांगतात. ते म्हणतात, वाट्याला आलेलं कर्म तर तुला करावंच लागेल. अगदी तू मी हे कर्म करणार नाही असे म्हणालास तरी तुझं स्वभाव तुला ते करायला भाग पाडेल. ते कर्म ज्या स्वरूपाचे असेल त्यानुसार तयार होणाऱ्या पाप पुण्याच्या प्रमाणात त्याची फळंही मिळणारच. ती भोगण्यासाठी तुला पुनर्जन्मही घ्यावा लागेल. हे एक न थांबणारे चक्र आहे. या चक्रातून सुटका होण्याची एक युक्ती तुला मी सांगतो. ती अशी की, जे काही काम करशील ते मला अर्पण करून टाक. तुझं मन लगेच ह्याला मान्यता देणार नाही पण जसजशी तुझी खात्री होत जाईल की तू कर्ता नसून मी कर्ता आहे तेव्हा ज्याचे कर्म त्याला अर्पण करण्यात तुला आपण वेगळे काही करतोय असे वाटणार नाही. नोकरी करत असताना मनुष्य मालकाने सांगितलेले काम बिनबोभाट करतो. तसेच हे समज. जेव्हा एखादं काम हातून घडतं तेव्हा ते ईश्वराने म्हणजेच मी तूझ्याकडून करून घेतलंय असं समजायचं. असं समजल्यामुळं मी सांगितलेलं काम माझ्या सांगण्याबरहुकूम तू केलंयस असं होतं. त्यामुळे ते मला अर्पण करण्यात तुला काहीच अडचण येणार नाही. तसं तू केलास की, त्यातून तयार होणारं पाप पुण्याचं बंधन तुला लागू होत नसल्याने ते भोगण्यासाठी तुला पुनर्जन्म मिळणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधायला हरकत नाही. मनुष्य कर्म करत असताना मी करत असलेल्या कर्मातून मला अमुक एक फळ मिळेल असे विचार त्याच्या मनात येत असतात ते तसे मिळाले तर ठीक अन्यथा काय करावे लागेल ह्याचेही विचार मनात डोकावत असतात. ह्या सगळ्या विचारांमुळे करत असलेल्या कामाच्या दर्जावर प्रतिकूल परिणाम होतो. पण बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे वागत गेल्यास कर्म करत असताना त्याबद्दलच्या फळाचे विचार माणसाच्या मनात येणार नाहीत. मनात फळाबद्दल विचार यायचे बंद झाले की चित्तात त्यावरील चिंतन बंद होते. अशा अवस्थेत कर्म करणारा मनुष्य कर्म करत असताना अतिशय आनंदात असतो. हा बाप्पाना राजाकडून व समस्त प्राणिमात्रांच्याकडून अपेक्षित असलेल्या चित्तशुद्धीचा पाया होय. ही चित्तशुद्धी काय साधून देते ते पाहुयात पुढील भागात .....                        क्रमश:

Advertisement
Tags :

.