For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपाहारगृहांना आता ‘फोस्टाक’ प्रमाणपत्र सक्तीचे

11:07 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
उपाहारगृहांना आता ‘फोस्टाक’ प्रमाणपत्र सक्तीचे
Advertisement

बेळगावमध्ये पुढील आठवड्यापासून प्रशिक्षण : अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सरकारचे पाऊल

Advertisement

बेळगाव : अन्नातील भेसळ रोखण्यासाठी व उपाहारगृहामधून ग्राहकांना दर्जेदार आहार मिळावा या उद्देशाने आहार सुरक्षा व दर्जा प्राधिकरणने आहार उद्योगातील व्यावसायिकांसाठी आहार सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणिकरण पत्र (फोस्टाक) सक्तीचे केले आहे. बेळगावमध्ये पुढील आठवड्यामध्ये फोस्टाकचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जनतेला दर्जेदार व ताजा आहार देणे ही उपाहारगृह चालविणाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हॉटेल, ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्या, पिझ्झा विक्री करणारे, रस्त्याच्या बाजूला लहान उपाहारगृह चालविणारे या सर्वांना फूड सेफ्टी ट्रेनिंग अॅण्ड सर्टिफिकेशन (फोस्टाक) सक्तीचे आहे. राज्यात 6 लाखाहून अधिक नोंदणीकृत आहार उद्योजक आहेत. सुमारे 14 लाख आहार उद्योजक प्राधिकरणकडे नोंदणी करून व्यवसाय चालवत आहेत. बेळगावमध्ये अलीकडच्या काळात प्रामुख्याने कोरोनाच्या काळानंतर खाद्यान्न उद्योग तेजीत सुरू आहे.

बहुतांशी हॉटेल, रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणारे, स्वीटमार्ट, तळलेले पदार्थ विक्री करणारे आपला व्यवसाय चालण्यासाठी खाद्यपदार्थांवर रंग आणि रसायनांचा वापर करतात. यामुळे खाद्यपदार्थ आकर्षक व अधिक चविष्ठ बनतात. पदार्थ खाण्यासाठी किंवा खरेदीसाठी खवय्यांची गर्दी होत असते. मात्र रंग व रसायनमिश्रित खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक ठरत असतात. पोटदुखी, उलटी-जुलाब होणे यासारख्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व्यावसायिकांच्या भेसळ करण्याच्या कृतीला चाप बसविण्यासाठी सरकारने ‘फोस्टाक’चे पाऊल उचलले आहे.

Advertisement

खाद्यपदार्थ बनविण्याच्या ठिकाणावरील सर्व कामगारांनी किंवा किमान पाच कामगारांनी फोस्टाकचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. आहार पदार्थ बनविण्यासाठी परवाना किंवा नोंदणी करताना फोस्टाक प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी निर्धारित शुल्क भरून केंद्र सरकार पुरस्कृत प्रशिक्षण संस्थेकडून दर्जेदार आहारासंबंधीचे एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आहार दर्जा कायद्यानुसार यापुढे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या सर्व उद्योजकांना फोस्टाक प्रमाणपत्र सक्तीचे राहील, असे आहार सुरक्षा-दर्जा प्राधिकरणने स्पष्ट केले आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आहार खात्याचे आयुक्त, आहार सुरक्षा अधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर फोस्टाक प्रमाणपत्र वितरण व प्रशिक्षण घेतलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी. केंद्र आणि राज्य सरकारने बेंगळूर येथील ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन या संस्थेला अधिकृत व प्रमाणित फोस्टाक सेवा देणारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

विविध पातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार

पुढील आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे. खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, तळणीसाठी कोणते तेल वापरावे, ते परत किती वेळा वापरावे, ग्राहकांना भेसळ किंवा तीव्र रसायन असणारे पदार्थ देणे टाळावे, कोणत्याही खाद्यपदार्थामुळे ग्राहकांना विषबाधा होणार नाही, याची काळजी घेणे अशा विविध पातळीवर प्रशिक्षण देण्यात येईल.

-डॉ. चेतन कंकणवाडी, अन्न सुरक्षा अधिकारी

Advertisement
Tags :

.