स्विट्झर्लंडमधील स्फोटात चाळीस ठार
शेकडो जखमी, दहशतवादी हल्ला असल्याची शंका
वृत्तसंस्था/बर्न (स्विट्झर्लंड)
युरोपमधील स्विट्झर्लंड या देशात नव्या वर्षानिमित्त पार्टी चाललेली असताना काँस्टेलेशन बारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप स्विस प्रशासनाने या घटनेचे कारण स्पष्ट केलेले नाही. तपास होत असून नेमके कारण लवकरच समजेल, अशी शक्यता आहे. या देशातील अल्पाईन रिझॉर्ट टाऊन येथे गुरुवारी हा स्फोट झाला आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी या बारमध्ये अनेक लोक एकत्र येऊन पार्टी करत होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री साधारणत: दीड वाजण्याच्या आसपास या बारच्या तळघरात प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली आणि या आगीत हा संपूर्ण बारच वेढला गेला. आतील लोकांनी बाहेर उड्या मारुन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, अनेकांना तसे करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे जीवीतहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दहशतवादी हल्ला आहे काय...
स्फोट होण्याची घटना आणि त्यात झालेली जीवीत हानी पाहता हा दहशतवादी हल्लाच असावा, असा अनेकांचा संशय आहे. तथापि, स्विस पोलिसांनी अद्याप ही घटना दहशतवादाशी संबंधित असल्याची घोषणा केलेली नाही. सध्यातरी ही अपघातीच घटना आहे, असे मानले जात आहे. मात्र, तपासाअंतीच या स्फोटाच्या नेमक्या करणांवर प्रकाश पडेल, असे तेथील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
400 जणांची क्षमता
स्फोट जेथे घडला, त्या ‘ला काँन्स्टेलेशन’ बारमध्ये एकावेळी चारशे लोक मावतात. नववर्षाच्या स्वागताची पार्टी असल्याने मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक येथे जमले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना स्फोटाच्या दणक्याने बारची इमारत हादरली आणि नंतर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली आहे. बारची इमारतही पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असे स्पष्ट केले गेले.
कारण स्पष्ट होताच कारवाई
या भीषण दुर्घटनेची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही, यासंबंधी अद्याप स्पष्टता नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा अपघात असल्याची शक्यतही अद्याप सोडून देण्यात आलेली नाही. तथापि, पुढची कारवाई स्फोटाचे कारण स्पष्ट झाल्यानंतरच केली जाणार आहे. कोणतीही शक्यता नाकारण्यात आलेली नाही. मात्र, प्रशासन एकाच निश्चित मतावर पोहचलेले नाही. तपास दलाच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पुरावे संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे. हा बाँब स्फोट किंवा अन्य प्रकारचा स्फोट असेल तर त्याचे पुरावे सापडल्याशिवाय राहणार नाहीत. नंतर कारवाईचे स्वरुप ठरविले जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.