पंचेचाळीस वर्षे केवळ दूध
राजस्थान राज्यात वास्तव्य करणाऱ्या पूनम सिंग नामक एका शेतकऱ्याची ही कहाणी आहे. हा व्यक्ती त्याच्या जन्मापासून आजपर्यंत तब्बल 45 वर्षे केवळ दुग्धप्राशन करुन जगला आहे. त्याने दुधाखेरीज अन्य कोणत्याही पदार्थाचे प्राशन किंवा सेवन केलेले नाही. मात्र, केवळ दुधाच्या आहारावर त्याची प्रकृती ठणठणती आहे, हे त्याचे वैशिष्ट्या आहे. हे दूधही तो अधिक प्रमाणात पीत नाही. केवळ सकाळी एक पेला आणि संध्याकाळी एक पेला असे दिवसाकाठी दोन पेले दूध त्याला पुरते. यापलिकडे तो कोणताही आहार किंवा पेय घेत नाही. अनेकांना त्याचे हे म्हणणे खोटे वाटते. पण ते खरे आहे असे त्याचे निकटवर्तीय स्पष्ट करतात. त्याच्या कुटुंबियांचेही हेच म्हणणे आहे. कोणीही त्याला दुसरे काही खाताना किंवा पिताना पाहिलेले नाही. एवढ्या कमी आहारावर ते जगतात कसे, हा अनेकांसाठी आश्चर्याचा विषय आहे. कित्येकांनी त्यावर संशोधन करण्याचा प्रयत्नही केला आहे. पण पूनम सिंग यांच्या प्रकृतीचे रहस्य त्यांना उलगडत नाही.
ते केवळ दूधच का पितात याचे कारण त्यांना विचारण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. तथापि, यामागे कोणतेही कारण नाही, असे त्यांचे प्रतिपादन आहे. मात्र, आपण अगदी क्वचित प्रसंगी चहा किंवा उसाचा रस पितो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, हे पदार्थ आपण क्वचितच घेतो. मुख्यत: दूध हाच आहार आहे. ही जन्मापासूनची सवय आहे. कधीही आपल्याला धान्य, भाजी, इतर दुग्धजन्य पदार्थ किंवा अन्य कोणताही खाद्यपदार्थ चाखून बघण्याचा मोह झालेला नाही. ते कोणाच्या लग्नाकार्याला आणि अन्य कोणत्या समारंभाला गेले, तर तेथे यांना खाण्याचा आग्रह केला जातो. तथापि, आपण 45 वर्षे पाळलेला नियम मोडण्यास मन होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या आयुष्यात ते आजवर केवळ एकदाच आजारी पडले आहेत. 2000 साली त्यांना कोणतातरी आजार झाला होता. तथापि, आजारातही त्यांनी त्यांचा नियम मोडला नाही. काही दिवसांनीच ते ठणठणीत बरे झाले. हा अपवाद वगळता त्यांना आजार माहीत नाही. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे ते पंचक्रोशीत अत्यंत प्रसिद्ध आहेत. अनेक जण त्यांना पहावयास आणि प्रत्यक्ष भेटावयास येतात. ते काम अन्य कोणत्याही शेतकऱ्याप्रमाणे करतात, असेही त्यांनी त्यांना भेटावयास आलेल्यांकडे स्पष्ट केले.