कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याचे भाग्य उजळले
रस्ता डांबरीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर : ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : रस्त्याच्या डांबरीकरणासह गटारींचे होणार बांधकाम
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर रस्त्याचे भाग्य उजळले असून सदर रस्त्याच्या डांबरीकरण व दोन्ही बाजूने काँक्रीट गटारी आदी कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाल्याचे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांना भेटावयास गेलेल्या ग्रा.पं. सदस्यांना सांगितले. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मागील आठवड्यामध्ये दै. ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून सदर रस्त्याची अवस्था व डांबरीकरणा संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी रस्ता डांबरीकरणासाठी मोठा निधी मंजूर केल्याबद्दल नागरिकांतून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. गेली दोन वर्षे सदर रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. ग्रा. पं. ने अनेकवेळा अर्जविनंत्या करूनसुद्धा रस्त्याची परिस्थिती जैसे थे होती. परंतु उशीरा का होईना रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रीट गटारीसह डांबरीकरण होणार असल्यामुळे नागरिकांना आता गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करायला मिळणार आहे.
सध्या पॅचवर्क-ऑक्टोबरमध्ये डांबरीकरण
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डांबरीकरण केल्यास उपयोग होणार नाही. यासाठी पावसाळ्यातील तीन महिने वाहनधारकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काँक्रीटीकरण गटारी तसेच पक्के डांबरीकरण करून वाहतुकीला सुरळीत करण्यात येणार असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदारांकडून रस्त्याची पाहणी
पी. आर. व्ही. खात्याचे अधिकारी कोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पी. ए. महंतेश कौजलगी व सद्दाम मुला, कंत्राटदार एस. एस. चौगुले यांनी लागलीच रस्त्याची पाहणी करून पावसाळा कमी होईपर्यंत रस्त्याचे पॅचवर्क करून व ऑक्टोबर महिन्यामध्ये डांबरीकरण करूया, असे उपस्थित ग्रा.पं.सदस्यांनी सांगितले. रस्ता पाहणीप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष रोहिणी नाथबुवा, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, यल्लोजी पाटील, सद्याप्पा राजकट्टी, उमेश पाटील, नवनाथ पुजारी, अनिल पावशे, पीडीओ गोविंद रंग्यापगोळ, मेनका कोरडे, सुप्रिया कोळी, मल्लाप्पा पाटील, श्रीकांत लमानी आदी उपस्थित होते.