युट्यूबच्या माजी सीईओंच्या पुत्राचे निधन
वयाच्या 19 वर्षीच घेतला जगाचा निरोप
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
युट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोज्स्की यांचा पुत्र मार्को ट्रॉपरचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे. मार्को यूसी बर्कर्लेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी होता. ट्रॉपरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अमली पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.
सुसान वोज्स्की यांच्या आई एस्थर यांनी एका पोस्टद्वारे मार्कोच्या निधनासंबंधी माहिती दिली आहे. मार्को हा यूसी बर्कलेमध्ये स्वत:च्या फर्स्ट ईयरच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये गणिताचे शिक्षण घेत होता. एस्थर यांनी मार्को एका अमली पदार्थाचे सेवन करत होता अशी माहिती दिली आहे.
युसी बर्कले कॅम्पसमधील वसतिगृहात मार्को वास्तव्यास होता. स्वत:च्या खोलीतून तो बराच वेळ बाहेर न पडल्याने त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला होता, परंतु कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी दरवाजा उघडल्यावर मार्कोचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या कुटुंबीयांना आता टॉक्सिकोलॉजी अहवालाची प्रतीक्षा आहे. यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. हा अहवाल प्राप्त होण्यास 30 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.