माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन
प्रतिनिधी/ पुणे
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, पुण्याचे माजी खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय 81) यांचे मंगळवारी पहाटे 3.30 वाजता पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मागच्या काही दिवसांपासून कलमाडी यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कलमाडी यांचे पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले होते. या वेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश कलमाडी यांनी एनडीएतून पदवी घेतल्यानंतर भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. स्वेच्छा निवृत्तीनंतर ते शरद पवारांच्या संपर्कात आले व त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून 1978 मध्ये त्यांची निवड झाली. तिथून त्यांच्या कारकिर्दीला वळण मिळाले. 1982 मध्ये ते प्रथम राज्यसभेचे खासदार बनले. त्यानंतर 1988, 1994, 1998 असे 4 वेळा ते राज्यसभेचे खासदार बनले. यासोबतच 1996, 2004, 2009 मध्ये असे 3 वेळा ते पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून विजयी झाले.
1995 ते 1996 पर्यंत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले. या काळात रेल्वेची पुणे डिव्हिजन त्यांनी तयार केली व असंख्य लांबपल्ल्याच्या रेल्वेगड्या पुण्याहून सुऊ केल्या. संसदेत रेल्वेचे अंदाजपत्रक मांडणारे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री होते. काँग्रेस संसदीय पक्षाचे 2003-2004 या काळात ते खजिनदारही होते. तसेच 2005 नंतर काँग्रेस संसदीय पक्षाचे ते सेव्रेटरी बनले.
भारतीय ऑलिंपिक महासंघाचे 1996 पासून तब्बल 16 वर्ष ते अध्यक्ष होते. तसेच एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे ते 2000 पासून अध्यक्ष होते. कलमाडी यांच्या पुढाकारातून 2008 मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि 2010 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. पुण्यात, राज्यात व देशात त्यांनी अनेक स्पर्धा घेतल्या. देशात अॅथलेटिक्स क्रीडा संस्कृती ऊजवण्यात व खेळाडूंना पुढे आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडानगरीची उभारणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. पुण्याच्या चौफेर विकासातही त्यांनी योगदान दिले.
1989 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना पुणे फेस्टिवल हा भव्य सांस्कृतिक महोत्सव त्यांनी सुरू केला. 1983 मध्ये देशातील पहिली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू केली. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पालकत्वही त्यांच्याकडेच जाते. यातून अनेक कलाकारांना त्यांनी संधी दिली. विविध उपक्रमांतून पुणे हा ‘ब्रँड’ पुढे आणत त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर नेले. प्रदीर्घ काळ नेतृत्व करणाऱ्या कलमाडी यांच्या राजकारणाला कॉमनवेल्थ घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर ओहोटी लागली. पक्षानेही त्यांना निलंबित केले. त्यातून ते बाहेर आले खरे. पण, राजकारणातून बाजूलाच पडले. त्यात त्यांना अनेक व्याधी सुरू झाल्या. अखेर त्यातच त्यांचे निधन झाले.