माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
विविध मान्यवरांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन : आज अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ लातूर
राजकारणातील शिस्तबद्ध नेते, अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे लातूर जिह्याचे सुपुत्र, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी सकाळी सहा वाजता वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता लातूर शहरानजीक वरवंटी शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लातूरचे नगराध्यक्ष ते लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदे भूषविलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहर, जिल्हा व राज्यातून विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नागरिकांनी लातूर येथील त्यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी लातूर येथे येऊन शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी शैलेश पाटील-चाकूरकर, अर्चना पाटील-चाकूरकर व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज मुरूमकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व इतर नेते उपस्थित होते.
शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967-69 या कालावधीत लातूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणास प्रत्यक्ष सुऊवात केली.
1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
1991 ते 1996 या काळात ते देशाचे 10 वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2004 मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद दिले. मात्र 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी राजीनामा दिला. 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
शिवराज पाटील चाकूरकर यांचा 1963 साली विजया पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या पश्चात शैलेश पाटील चाकूरकर हा मुलगा, अर्चनाताई पाटील चाकूरकर या सूनबाई तसेच दोन नाती असा परिवार आहे. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित आहेत. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जाते. शिवराज पाटील हे सुमारे सहा दशके राजकारणात सक्रिय असले तरी गेल्या काही वर्षात मात्र ते राजकारणातून निवृत्त झाल्यासारखे होते.
मुख्यमंत्र्यांकडून चाकूरकरांना श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील- चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.