शिरगाव हायस्कूल इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांकडून दीड लाखांची देणगी
देवगड: शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरण योजनेसाठी सन १९८६-८७ च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचा निधी शाळेला सुपुर्द केला. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शाळेच्या विकासासाठी दिलेले हे योगदान कौतुकास्पद ठरत आहे.
माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच शाळेला भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे हा निधी सुपुर्द केला. यावेळी संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, चिटणीस पंडित तावडे, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, मुंबई कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, अमित साटम, मिलिंद साटम, शाळा समिती सदस्य मंगेश लोके, प्रभारी मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे आदी उपस्थित होते.
सन १९८६-८७ च्या एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी सुधीर साटम, संतोष तावडे, रवींद्र डांगवे, सत्यपाल लाडगावकर, गणेश आईर, राजेंद्र साटम, ज्योती प्रकाश मोसमकर, सुश्मिता सत्यवान चौकेकर आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी तथा मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवरील विश्वास हा संस्थेच्या यशाची खरी पावती असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी दिलेला निधी ही केवळ देणगी नसून संस्थेच्या पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्री कार्यपद्धतीवर त्यांनी व्यक्त केलेल्या दृढ विश्वासाची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेने विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा यांची जाणीव ठेवून अनेक वर्षांनंतर शाळेच्या विकासासाठी आर्थिक योगदान देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. इमारत नूतनीकरणासाठी मिळालेला हा निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
“हा निधी इमारतीच्या नूतनीकरणासाठी आहे; मात्र त्यामागची भावना संस्थेवरील विश्वासाच्या नूतनीकरणाची आहे,” असे प्रतिपादन सत्यपाल लाडगावकर यांनी केले. माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध भविष्यातही अधिक दृढ व्हावेत आणि त्यांच्या सहकार्याने संस्थेच्या विकासाला आणखी बळ मिळावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.