माजगाव माजी सरपंच संदीप सावंत यांचे निधन
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव माजी सरपंच संदीप सिताराम सावंत (५७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. माजगावच्या विविध क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या आकस्मित निधनाचा सावंत कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संदीप सावंत यांनी सन १९९९ पासून माजगावचे पाच वर्षे सरपंच पद तर २००४ पासून पाच वर्षे उपसरपंच पद भूषविताना गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. सुरुवातीला ते माजगाव इन्स्ट्रुमेंट कंपनीत तर सध्या माणगाव येथील थर्मल कंपनीत व्यवस्थापक होते. माजगाव खालची आळी येथील जय हनुमान मित्र मंडळ तसेच खालची आळीकर सावंत भोसले परिवार व मित्र मंडळाच्या सर्व उपक्रमात ते नेहमीच अग्रस्थानी असायचे. येथील प्रकाश उर्फ बाळू सावंत यांचे काका, निवृत्त शिक्षक अनंत सावंत आणि जिल्हा परिषदेचे निवृत्त हेड ड्रॉसमन विष्णू सावंत यांचे ते सख्खे चुलत भाऊ तर डॉ सतीश सावंत आणि वैभव सावंत यांचे ते सख्खे चुलत काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, दोन बहिणी, भावजय, पुतण्या, भाऊ, भावोजी असा परिवार आहे.