अॅटलस सायकल्सच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या
सलिल कपूर यांनी स्वत:वर झाडून घेतली गोळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अॅटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलिल कपूर यांनी मंगळवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. यासंबंधी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
सलिल कपूर यांनी मंगळवारी दुपारी लुटियन्स दिल्ली भागातील स्वत:च्या घरात कथित स्वरुपात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. सलिल यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सर्वप्रथम त्यांच्या व्यवस्थापकाने पाहिला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कपूर यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्वरद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्यांची पत्नी आणि दोन मुलगे आणि एक मुलगी वेगळी राहत होती. घटनास्थळावरून एक सुसाइट नोट हस्तगत झाली असून यात कपूर यांनी स्वत:वरील कर्जाच्या भाराचा उल्लेख केला आहे.
कपूर यांना यापूर्वी 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यारव आर्थिक फसवणुकीचे दोन वेगवेगळे गुन्हे नोंद होते. तर जानेवारी 2020 मध्ये सलिल कपूर यांच्या वहिनी नताशा कपूर यांनी याच घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांनी स्वत:च्या सुसाइड नोटमध्ये परिवाराच्या सदस्यांनी स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले होते. परंतु आत्महत्येमागील कारण त्यांनी नमूद केले नव्हते.