For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न

06:39 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांचा आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement

एपस्टीन फाइल्समध्ये नाव : भ्रष्टाचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ ओस्लो

नॉर्वेचे माजी पंतप्रधान थोरब्योर्न जगलँड यांना आत्महत्येच्या प्रयत्नानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पूर्ण प्रकरण लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबतच्या त्यांच्या संबंधांवरून सुरू असलेल्या चौकशीशी निगडित आहे. जगलँड यांच्यावर ‘एग्रेवेटेड करप्शन’ म्हणजे ‘गंभीर भ्रष्टाचारा’चाही आरोप असून याकरता कमाल 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

नॉर्वेची आर्थिक गुन्हे तपास संस्था ‘ओकोक्रिम’ याप्रकरणी तपास करत आहे. जगलँड विरोधात तपास करण्यासाठी ठोस आधार आहे. चौकशी अंतर्गत ओस्लो येथील त्यांचे निवासस्थान आणि दोन अन्य मालमत्तांमध्ये झडती घेण्यात आल्याची माहिती ओकोक्रिमचे संचालक पॉल लोनसेथ यांनी दिली.

पंतप्रधान पदावर असताना जगलँड यांना भेटवस्तू, कर्ज किंवा अन्य लाभ मिळाले होते का याचाही तपास केला जात आहे. तर झडती घेतल्यावर जगलँड यांना औपचारिक स्वरुपात संशयिताचा दर्जा देण्यात आला असून  आता त्यांची चौकशी केली जाणार आहे.

संबंध चुकीचे होते : जगलँड

जगलँड हे 1996-97 दरम्यान नॉर्वेचे पंतप्रधान होते. याचबरोबर ते विदेशमंत्री, नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे अध्यक्ष (2009-15) आणि युरोपची मानवाधिकार संस्था कौन्सिल ऑफ युरोपचे महासचिव (2009-19) देखील राहिले आहेत. एपस्टीनोबतचे माझे संबंध ‘चुकीचा निर्णय’ किंवा ‘खराब विचारा’चा परिणाम होते. परंतु मी कुठलेच अवैध कृत्य केलेले नाही. तपासात मी पूर्ण सहकार्य करणार असून सत्य पूर्णपणे समोर यावे अशी इच्छा असल्याचे जगलँड यांनी म्हटले आहे.

एपस्टिनच्या संपत्तींचा अनेकदा दौरा

अमेरिकेच्या न्याय विभागाकडून 30 जानेवारी रोजी जारी दस्तऐवजांमधून जगलँड आणि त्यांचा परिवार अनेकदा एपस्टीनच्या पॅरिस, न्यूयॉर्क आणि पाम बीच येथील संपत्तीवर गेला होता असे समोर आले.  एपस्टीनने जगलँड यांच्याकडे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घडवून आणण्यासाठी मदत मागितली होती. तसेच तो स्वत:च्या काही व्यावसायिक आणि आर्थिक योजना पुढे नेण्यासाठी मदत इच्छित होता. दस्तऐवजांमध्ये जगलँड यांना ‘नोबेल बिग शॉट’ म्हटले गेले आहे. जगलँड यांची प्रतिष्ठा अन् ओळख एपस्टीनच्या कामी येत होती. तर दुसरीकडे एपस्टीन त्यांना लक्झरी ट्रीप, भेटवस्तू अन् इतर सुविधा पुरवत होता. परंतु तपास यंत्रणांनी जगलँड यांचे नाव एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यांशी जोडलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.