Political News : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर
त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती, तेव्हा मी साधा कार्यकर्ता होतो
चिपळूण : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. तसे संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिले. लोकमान्य टिळक वाचनालयाच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रालयाच्या उद्घाटनासाठी सामंत रविवारी येथे आले होते.
यानिमित्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात रमेश कदम यांचा सामंत यांच्याहस्ते सत्कार झाल्यानंतर कदम यांनी मनोगत व्यक्त करताना माझे अगदी जवळचे स्नेही असा सामंत यांचा उल्लेख केला. हाच धागा पकडून सामंत यांनी आपल्या 25 मिनिटांच्या मार्गदर्शनात 15 मिनिटे कदम यांचेच कौतुक केले.
36 वर्षापूर्वी कदम यांनी लोकमान्य टिळक वाचन मंदिराला मदत केली त्याच वाचनालयाचे सध्याचे महत्व लक्षात घेता असा दूरदृष्टी असणारा नगराध्यक्ष हवा असे त्यांनी सांगितले. जेव्हा कदम जिल्ह्यास्तरावरील मोठे नेते होते. त्याच्या शब्दाला मोठी किंमत होती तेव्हा मी साधा कार्यकर्ता होतो. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास मी जवळून पाहिला आहे.
दुसऱ्याला मोठा करण्यात त्यांना जो आनंद असतो तोही मी पाहिला आहे. मला पहिल्यांदा पालकमंत्री पद मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता हे मी कधीही विसरणार नाही. मी एखाद्याला संधी दिली तर तो मोठा होईल अशी भावना कदम यांनी कधीच ठेवली नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठांचा आशिर्वाद मिळावा असे प्रत्येकाला वाटते.
तिच भावना माझीही आहे. त्यामुळे आम्ही कार्यक्रमस्थळी एकाच गाडीतून आलो. मधे प्रकाश देशपांडे होते. चर्चा झाली आहे. ती कसली हे मी सांगणार नाही. मात्र महिनाभरात परिणाम दिसेल असे सामंत यांनी जाहीर केल्याने कदम हे सेनेत जाण्याचे संकेत मिळाले असून तशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
तसे काही नाही, कदम यांचे हसतच उत्तर
कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांनी येथे कदम यांची भेट घेत याबाबत त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते हसतच तसे काही नाही रे असे उत्तर देत होते. त्यानंतर ते निघून गेले.
कदम यांचा असा आहे राजकीय प्रवास
रमेश कदम हे सुरुवातीला कॉग्रेसमध्ये होते. त्यानंतर झालेल्या पक्षीय घडामोंडीनंतर ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत आले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. येथून शेकाप, भाजप व पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला असून आता ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत.