ज्या पक्षाकडे जागा...त्याचाच घेणार झेंडा! राधानगरीतून के.पी.पाटील यांची भूमिका
महाविकास आघाडीसोबत जाण्यावर शिक्कामोर्तब; महायुतीला चौथा धक्का
कृष्णात चौगले कोल्हापूर
‘राधानगरी’चे माजी आमदार के.पी.पाटील यांनी महायुतीला सोडचिट्टी देत महाविकास आघाडीचा पर्याय निवडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघ ‘मविआ’च्या ज्या घटक पक्षाच्या वाट्याला जाईल, त्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. परिणामी गेल्या आठवड्याभरात महायुतीला सलग चौथा राजकीय धक्का बसला आहे. चिन्ह कोणतेही असो, निवडणूक लढायचीच असा पक्का निर्णय के.पी.पाटील यांनी घेतला आहे. गतविधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे आता या जागेवर उबाठा शिवसेनेकडून दावा केला असल्याचे समजते. त्यानुसार उबाठा गटाकडून के.पी.पाटील यांना ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु आहेत.
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यामय घडमोडींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. यामध्ये बहुंख्य आमदारांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाशी हातमिळवणी केली. परिणामी ‘मविआ’चे घटक पक्ष असलेली उबाठा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीकडे मोजकेच आमदार शिल्लक राहिले. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देत मतदारांनी महाविकास आघाडीला झुकते माप दिले. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या ‘मविआ’च्या तिन्ही घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. यामध्ये गतविधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाकडे जागा होती, त्याच पक्षाकडे तो मतदारसंघ देण्याबाबत ‘मविआ’च्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते. त्यामुळे ‘राधानगरी’ची जागा उबाठा शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता असून उमेदवारीची माळ के.पी.पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे.
गतविधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी 18 हजार 881 मतांची आघाडी घेत माजी आमदार के.पी.पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी गोकुळचे तत्कालिन संचालक अरुण डोंगळे यांना 15 हजार 414 इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदारसंघात बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसह गेल्या पाच वर्षात झालेल्या अनेक राजकीय घडामोडी पाहता के.पी.पाटील यांची वाटचाल ‘देर आये दुरुस्त आये’ अशीच ठरली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लावलेल्या राजकीय जोडण्या आणि ‘मविआ’चा ‘माईंड गेम’ कितपत यशस्वी होतो हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोट्यावधीची विकासकामे केली आहेत. या विकासकामांच्या जोरावर आणि महायुतीने जनसामान्यांसाठी राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून आमदार आबिटकर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची दिशा देखील बदलली जाण्याची शक्यता आहे.
येत्या चार दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी शक्य
राधानगरी मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार द्यायचा अशी भूमिका घेत माजी आमदार के.पी.पाटील यांना मातोश्रीवरून भेटण्यासाठी निमंत्रण दिले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानुसार के.पी.पाटील येत्या चार दिवसांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या चार दिवसांत मोठ्या राजकीय घडमोडी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढविणार
राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहे. पण हा मतदारसंघ ‘मविआ’च्या कोणत्या घटक पक्षाकडे जातो, हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे जागा वाटपाच्या निर्णयानंतर ही जागा कोणत्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षातून निवडणूक लढविणार आहे.
के.पी.पाटील, माजी आमदार