माजी आमदार अरविंद पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड
खानापूर : संपूर्ण जिल्ह्याचे तसेच राज्यस्तरावरील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे चर्चेची ठरलेली बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खानापूर तालुक्यातून संचालक म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यांची रविवारी बिनविरोध निवड जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी बिनविरोध निवडीचा विजयोत्सव खानापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्षापासून डीसीसी बँकेचे संचालक म्हणून तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या विरोधात चन्नराज हट्टीहोळी यांनी निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करून तालुक्यात मुसंडी मारली होती. मात्र राज्याच्या नेतृत्वाने खानापूर तालुक्याच्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने हट्टीहोळी यांनी माघार घेतली होते. मात्र गर्लगुंजी पीकेपीएसचे राजू सिद्धाणी यांनी डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. शनिवारी आणि रविवारी झालेल्या बैठकीत राजू सिद्धाणी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अरविंद पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी गेल्या 1 वर्षापासून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आणि तालुक्यातील पीकेपीएस सोसायट्यांचा पाठिंबा मिळविला होता. त्यामुळे जारकीहोळी कुटुंबीयांनी तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांचा अरविंद पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. आणि ही निवडणूक बिनविरोध होईल, असे भाकीत केले होते. मात्र आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही खानापुरातून डीसीसी बँकेसाठी प्रयत्न सुरू केल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र अरविंद पाटील यांनी सर्व स्तरावर तडजोडीची भूमिका घेत चन्नराज हट्टीहोळी यांना माघार घेण्यास भाग पाडले. यात माजी आमदार अंजली निंबाळकरसह बेळगाव जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी अरविंद पाटील यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे अरविंद पाटील यांची पाचव्यांदा डीसीसी बँकेवर वर्णी लागली आहे. अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांत तसेच सहकार क्षेत्रात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यासह जिल्ह्यातून अरविंद पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आज जल्लोषी मिरवणूक
मार्केटींग सोसायटी निवडणुकीतील विजय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या अविरोध निवडीबद्दल सोमवार दि. 13 रोजी खानापुरात शहरात माजी आमदार अरविंद पाटील यांच्या समर्थकांनी विजयोत्सवाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे.ही मिरवणूक दुपारी 4 वाजता बसवेश्वर चौक येथून सुरू होणार आहे.
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची इतर वर्गातून वर्णी
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही खानापूर तालुक्यातून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र खानापूर तालुक्यातून माघार घेण्यास जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नेत्यानी भाग पाडले होते. मात्र ऐनवेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांना इतर वर्गातून त्यांची वर्णी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून वर्णी लागलेली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात तसेच सहकार क्षेत्रातील जाणकारांना सुखद धक्का बसला आहे.