माजी मंत्री शिवानंद कौजलगी यांचे वृद्धापकाळाने निधन
आज बैलहोंगलमध्ये सरकारी इतमामात होणार अंत्यसंस्कार
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व केएलई संस्थेचे माजी कार्याध्यक्ष शिवानंद हेमाप्पा कौजलगी (वय 87) यांचे शुक्रवारी सकाळी बैलहोंगल येथे निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता अनिगोळ, ता. बैलहोंगल येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, काँग्रेस नेते बसवराज कौजलगी, ज्येष्ठ कन्या शैलजा असा परिवार आहे. कर्नाटकाच्या राजकारणातील एक सज्जन नेते अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या इच्छेनुसार डॉ. रामण्णावर ट्रस्टच्या माध्यमातून केएलई संस्थेच्या नेत्रभांडाराला नेत्रदान करण्यात आले.
शिवानंद कौजलगी यांच्या निधनाने बैलहोंगल परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मठाधीश, राजकीय नेते, कार्यकर्ते बैलहोंगलकडे येत आहेत. विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी प्रवचनासाठी बैलहोंगलला आले होते. त्यावेळी शिवानंद कौजलगी यांनी आपल्या घरी बोलावून त्यांची पाद्यपूजा केली. आपल्याला मोक्षाच्या वाटेवर चालायचे आहे, आशीर्वाद द्या, अशी विनंती स्वामीजींना केली होती. त्यावेळी त्यांच्या पाठीवर थाप मारून ‘तुम्ही 87 वर्षांचे आहात’ असा आशीर्वाद दिला होता, असे शिवलिंग परंडी यांनी सांगितले.
शिवानंद कौजलगी हे व्यवसायाने वकील होते. जनता पक्ष, जनता दलातून ते आमदार झाले होते. एच. डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीही होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत 456 उमेदवार रिंगणात असताना ते खासदार झाले होते. अनेक संस्थांवर त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.
