माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना दिलासा
आयपीसी सेक्शन 354अ अंतर्गत दाखल प्रकरण विचारात घेण्यास न्यायालयाचा नकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
लैंगिक शोषण प्रकरणात निजदचे आमदार व माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना दिलासा मिळाला आहे. रेवण्णांविरुद्ध आयपीसी सेक्शन 354अ अंतर्गत दाखल असलेले प्रकरण विचारात घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेचे शोषण केल्याचा आरोप होळेनरसीरपूरचे निजद आमदार एच. डी. रेवण्णा यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध होळेनरसीरपूर पोलीस स्थानकात भा. दं. वि. च्या कलम 354अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विलंबाने दाखल फौजदारी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून बेंगळूरमधील 42 व्या एमसीजेएम न्यायालयाने रेवण्णा यांना या प्रकरणातून मुक्त केले आहे. न्यायमूर्ती के. एन. शिवकुमार यांनी सोमवारी हा आदेश दिला.
रेवण्णा यांना अटक झाली तेव्हा त्यांच्याविरुद्ध दोन विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातील एक प्रकरण उच्च न्यायालयाने रद्द केले होते. आता आयपीसी सेक्शन 354अ अंतर्गत दाखल असलेले प्रकरण विचारात घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण रद्द झाले आहे.