For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी मंत्री सी.टी.रवी-लक्ष्मी हेब्बाळकर प्रकरण तापले

06:06 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी मंत्री सी टी रवी लक्ष्मी हेब्बाळकर प्रकरण तापले
Advertisement

बेळगावात यंदाचे हिवाळी अधिवेशन अखेरच्या दिवशी घडलेल्या प्रकरणाने चांगलेच गाजले. अगदी अखेरच्या दिवशी विधान परिषदेत माजी मंत्री सी. टी. रवी  यांनी महिला, बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबतील अपशब्द वापरल्याचे प्रकरण समोर आले. गुरुवारी या घटनेला 8 दिवस उलटलेले असले तरी सध्याही हे प्रकरण सर्वच माध्यमात गाजते आहे. सध्याला हे प्रकरण अधिक जटील झालेले आहे.

Advertisement

राजकारण किंवा समाजकारणात अलीकडे सभ्यता हरवत चालली आहे. एखाद्या व्यासपीठावरून बोलताना कसलेही तारतम्य न बाळगता बेताल बोल बोलले जात आहेत. विधिमंडळही आता याला अपवाद राहिले नाही. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर रोजी संपले. शेवटच्या दिवशी विधान परिषदेत माजी मंत्री सी. टी. रवी यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी वापरलेल्या अपशब्दामुळे सध्या कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या काळात विकासात्मक मुद्द्यावर झालेली चर्चा गाजली नाही. मात्र, अपशब्द प्रकरणावरून भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलेच जुंपले आहे. विधान परिषदेत सी. टी. रवी यांनी आपल्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करीत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले. आपल्यावरील हा आरोप सी. टी. रवी यांनी फेटाळला आहे. आक्का सांगतात तो शब्द आपण वापरला नाही, अशी भूमिका रवी यांनी घेतली आहे. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनीही परिषदेच्या इतिवृत्तात तो अपशब्द दाखल झाला नाही, असे सभाध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी जाहीर केले आहे.

राज्य सरकारने हे प्रकरण सध्या सीआयडीकडे सोपविले आहे. सी. टी. रवी यांनी वापरलेला अपशब्द, त्यानंतर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विधानसभेच्या कॉरिडॉरमधून रवी यांना केलेली अटक, 19 डिसेंबर रोजी रात्रभर बेळगाव, धारवाड, बागलकोट या तीन जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी त्यांना फिरवलेला प्रकार ठळक चर्चेत आला आहे. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तर फेक एन्काऊंटरमध्ये सी. टी. रवी यांना संपवण्याचा घाट होता, असा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकारावरून काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसलेच नियम पाळले नाहीत. सी. टी. रवी यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने पोलीस दलावर ताशेरे ओढले आहेत. विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून विधान परिषदेच्या सदस्यावर अटकेची कारवाई करताना ज्या नियमांचे पालन करायला हवे होते, त्यांचे पालन झाले नाही. एखाद्या गुन्हेगारी व्यक्तिमत्त्वाच्या माणसाला उचलल्याप्रमाणेच सी. टी. रवी यांना उचलण्यात आले आहे. न्यायालयानेही पोलीस दलाला यासंबंधी खडसावले आहे.

Advertisement

विधान परिषदेत अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला आहे. नियमानुसार एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांना विधान परिषदेच्या सभागृहात पंचनामाही करता येणार नाही. यासाठी सभापतींची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेक राज्यातील प्रकरणांचा अभ्यास करून पुढे काय करायचे? या विचारात पोलीस अधिकारी आहेत. सध्या राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यामुळे सीआयडी तपासादरम्यान पंचनामा करण्यासाठी सीआयडीला सभागृहात प्रवेश करावा लागणार आहे. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सीआयडीच्या पथकाला सभागृहात प्रवेश द्यायचा का? याविषयी चर्चा करण्यात येत आहे. त्यांना पंचनामा करायचा असेल तर प्रवेश द्यावा लागणार, अशी भूमिका सभापतींनी घेतली आहे. सीआयडीचे पोलीस अधीक्षक राघवेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात यासंबंधीच्या घडामोडींना गती येणार आहे. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बेळगावात झाले होते. या अधिवेशनाचा शतकमहोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने व्यापक तयारी केली आहे. अधिवेशनानंतर अपशब्द प्रकरणावरून दोन पक्षात पुन्हा जुंपणार आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आपल्याविषयी सी. टी. रवी यांनी अपशब्द वापरल्यासंबंधीचे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे जाहीर केले आहेत. त्यानंतर आपण अपशब्द वापरले नाहीत, अशी भूमिका घेणाऱ्या सी. टी. रवी यांनी धर्मस्थळ येथील मंजुनाथ स्वामींच्या सानिध्यात शपथपूर्वक सांगावे, असे उघड आव्हान दिले आहे. सी. टी. रवी यांनी मात्र हे आव्हान स्वीकारले नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर केवळ धर्मस्थळच का? सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावरही जाऊ, असे सांगितले आहे. ही घटना घडली तेव्हापासून या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. गुरुवारी या घटनेला एक आठवडा पूर्ण झाला. आठ दिवसानंतरही या घटनेची तीव्रता कायम आहे.

या प्रकरणात पोलीस दलाची भूमिका संशयाला थारा देण्यासारखी आहे. खरेतर सुवर्णसौध हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते. या घटनेसंबंधी याच पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. सी. टी. रवी यांना अटक केल्यानंतर बेळगाव पोलिसांनी त्यांना खानापूर पोलीस स्थानकात नेले. तेथून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात फिरवण्यात आले. खानापूर पोलीस स्थानकात भाजपचे नेते, कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे आपण रवी यांना इतर ठिकाणी हलवले. पत्रकारही आपले पाठलाग करीत होते.

पत्रकारांना चुकविण्यासाठी त्यांना तीन जिल्ह्यांचे दर्शन घडवावे लागले, असे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने पोलीस दलावर कडक शब्दात ताशेरे ओढल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांना जाग आली नाही. एक चूक झाकण्यासाठी त्यांच्याकडून चुकांची मालिकाच सुरूच आहे. खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांना निलंबित करण्यात आले आहे. खरेतर मंजुनाथ नायक या अधिकाऱ्याची या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात घटना घडली आहे. सी. टी. रवी यांना अनावश्यकपणे तीन जिल्ह्यांचे दर्शन घडवणाऱ्या अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दि. 26 व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानंतर हे प्रकरण आणखी तापणार आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.