पावसाळ्यातही सावंतवाडीला पाणीटंचाईची झळ
नागरिक त्रस्त ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा प्रशासनाला इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी
एकीकडे पावसाळ्याने जोर धरला असताना, दुसरीकडे सावंतवाडी शहरातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागातील अव्यवस्था आणि अनागोंदी कारभार या गंभीर समस्येला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. शहरात सक्षम पाणीपुरवठा अभियंता नसल्याने ही समस्या अधिकच बिकट झाल्याचे ते म्हणाले.गेल्या महिनाभरापासून शहरातील नागरिक पाणीटंचाईमुळे हैराण झाले आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचे साळगावकर यांनी म्हटले आहे. "प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी ढिम्म आहेत, त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही," असे ते म्हणाले.सावंतवाडी शहराला कित्येक महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकारी केवळ चेकवर सह्या करण्यापुरतेच असल्याचे चित्र आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होत असून, प्रशासकाची नेमकी जबाबदारी काय, असा प्रश्न साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. प्रशासक कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत नाहीत आणि केवळ सह्या करून त्यांची जबाबदारी संपते का, याचा खुलासा प्रशासकांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे."प्रशासक हवेत कशाला? त्यांची जबाबदारी काय?" असा सवाल करत साळगावकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या गंभीर रोषाला सामोरे जावे लागेल, असा अंतिम इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.