कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन

06:32 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूरमधील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास : विविध मान्यवरांकडून शोक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन (वय 84) यांनी शुक्रवार 25 रोजी सकाळी 10:43 वाजता बेंगळूर येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून  ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. त्यांचे पार्थिव बेंगळूरच्या रामन रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

कस्तुरीरंगन हे 1994 ते 2003 या कालावधीत इस्रोचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली चांद्रयानसारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास भारताने सुरुवात केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पश्चिम घाटातील 59,940 चौ. कि. मी. (37 टक्के) भूप्रदेश पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून शिफारस केली होती. कस्तुरीरंगन यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 रोजी केरळच्या एर्नाकुलम येथे सी. एम. कृष्णस्वामी अय्यर आणि विशालाक्षी या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळविली. 1971 मध्ये अहमदाबाद येथे खगोलशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली. त्यांच्या असामान्य कार्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना 2000 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याआधी पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते.

इस्रोमध्ये अनेक मोहिमांचे नेतृत्त्व

कस्तुरीरंगन यांनी इस्रोमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ काम केले. सुमारे 9 वर्षे त्यांनी इस्रोचे अध्यक्षपद भूषविले होते. हा काळ भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात अत्यंक कठीण काळ होता. या काळात इस्रोवर अनेक आंतराष्ट्रीय स्तरावर निर्बंध लादण्यात आले होते. 1998 मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले होते. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्त्वाखालीच इस्रोने स्वावलंबी होण्याचा मार्ग स्वीकारत चांद्रयान मोहिमांसाठी नियोजन करण्यास प्रारंभ केला होता. त्यांच्या नेतृत्त्वाखाली अवकाश प्रक्षेपण वाहन पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल (जीएसएलव्ही) ची पहिली यशस्वी उ•ाण चाचणीही त्यांच्याच नेतृत्त्वाखाली झाली होती.

एनईपीसाठी महत्त्वपूर्ण योगदान

कस्तुरीरंगन ते नव्या शिक्षण धोरणाच्या (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते. त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. 2003 ते 2009 या कालावधीत राज्यसभेचे सदस्यपदही भूषविले होते. त्यांनी तत्कालिन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही जबाबदारी निभावली होती. एप्रिल 2004 ते 2009 पर्यंत बेंगळूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टटीजेचे संचालक होते. त्यांनी केंद्र सरकारने रचलेल्या अनेक समित्यांचे नेतृत्त्व केले होते. उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध विषयांवर सरकारला सल्ले दिले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article