ईस्टर बॉम्बस्फोट प्रकरणी माजी गुप्तचर प्रमुखाला अटक
श्रीलंकेत मोठी कारवाई : भारताच्या इनपूटकडे केले होते दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेत 2019 मधील ईस्टर संडे बॉम्बस्फोटांप्रकरणी माजी गुप्तचर प्रमुख मेजर जनरल सुरेश सैली यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे श्रीलंकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बॉम्बस्फोटाच्या अनेक आठवड्यांपूर्वीच भारताने श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणांना इनपूट देण्यास सुरुवात केली होती असा खुलासा या कारवाईमुळे जाला आहे. भारतीय यंत्रणांच्या इनपूट्सकडे दुर्लक्ष करत श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणांनी बॉम्बस्फोट होऊ दिले होते.
भारताने बॉम्बस्फोटाच्या अनेक आठवड्यांपूर्वीच कटाच्या सूत्रधाराची ओळख आणि संभाव्य टार्गेटविषयी माहिती श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविली होती. तरीही कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. या बॉम्बस्फोटांमध्ये 250 हून अधिक जणांचा बळी गेला होता. हे बॉम्बस्फोट स्थानिक कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात आणि जमीयतुल मिलथु इब्राहिमने मिळून घडवून आणले होते. बॉम्बस्फोटात सामील हल्लेखोर कट्टरवादी मानसिकता आणि इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित होते.
राजपक्षेंच्या राजकीय लाभाचा विचार
श्रीलंकेत त्यावेळी रानिल विक्रमसिंघे यांचे सरकार होते आणि बॉम्बस्फोटानंतर गुप्तचर अपयशासाठी त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मेजर जनरल सुरेश सैली यांना गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारने आघाडीची गुप्तचर संस्था स्टेट इंटेलिजेन्स सर्व्हिसच्या (एसआयएस) प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. सैली यांना प्रिव्हेंशन ऑफ टेररिजम अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
मेजर जनरल सैलींवरील आरोप
-2019 च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये कट रचणे अन् दहशतवाद्यांची मदत करण्यात भूमिका बजावल्याचा सुरेश सैलींवर आरोप आहे.
-सैली यांनी राजपक्षे परिवाराला निवडणूक जिंकवून देण्यासाठी देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने स्फोट होऊ दिले होते.
-भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक इशाऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे आणि बॉम्बस्फोट घडू देण्याचा आरोप आहे.