हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे निधन
८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गुरुग्रामधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. त्यांना ११.३० च्या दरम्यान या हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. चौटाला हे सातवेळा आमदार आणि पाचवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
ओम प्रकाश चौटाला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ साली हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील चौटाला या गावात झाला. चौटाला हे हरियाणाचे ७ वे मुख्यमंत्री होते. चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे पुत्र होत. चौटाला यांचे वडील चौधरी देवीलाल यांनी हरियाणा राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणाच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.
चौटाला हे हरियाणाच्या ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात प्रसिद्घ होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. चौटाला यांना दोन मुले असून त्यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी दोन मुले आहेत. हे सर्व राजकारणात सक्रिय आहेत. चौटाला यांच्या मागे मोठा परिवार आहे.