ऑटोचालकाकडून गोव्याच्या माजी आमदारांचा बळी
बेळगावात कार ऑटोला घासल्याने पाठलाग करून मारहाण, खडेबाजारमधील घटना : पोलिसांकडून ऑटोचालकाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी 1 ते 1.30 यावेळेत खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजसमोर ही घटना घडली आहे. फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे कामानिमित्त जीए 03, सी 2800 क्रमांकाच्या कारमधून शनिवारी सकाळी बेळगावला आले होते. खडेबाजारमधून श्रीनिवास लॉजला जाताना कार एका ऑटोला घासून गेली. त्यामुळे झालेल्या वादावादीनंतर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून अमिरसोहेल ऊर्फ मुजाहिद शकील सनदी (वय 27) रा. सुभाषनगर या ऑटोचालकाला अटक केली आहे.
घटनास्थळावरून व पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजकडे आपल्या कारमधून जाताना लवू मामलेदार यांची कार ऑटोला घासून गेली. त्यांचा पाठलाग करीत ऑटोचालक अमिरसोहेल हा श्रीनिवास लॉजपर्यंत पोहोचला. लवू हे पार्किंगमध्ये आपली कार उभी करून लॉजकडे जाताना वाटेतच अडवून ऑटोचालकाने त्यांना बेदम मारहाण केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडवून घेतले व लवू यांना लॉजवर जाण्यास सांगितले. पायरी चढून लॉजकडे जाताना रिसेप्शनजवळ ते कोसळले. तातडीने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना कारमधून सिव्हिल हॉस्पिटलला नेले. दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लवू मामलेदार हे पंधरा दिवस, आठवड्यातून एकदा बेळगावला येत होते. त्यावेळी खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजमध्ये ते वास्तव्य करायचे. त्यामुळे तेथील कर्मचारीही त्यांना परिचित होते.
ऑटोचालकाकडून हल्ला झाला, त्याचवेळी फोंड्याचे सरपंच नाविद तहसीलदार हे श्रीनिवास लॉजजवळ होते. त्यांनी लवू मामलेदार यांना ओळखले, हे गोव्याचे माजी आमदार असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. फोंडा येथील लवू यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. हॉटेलचे व्यवस्थापक अडव्याप्पा करलिंगन्नावर हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असून त्यांनीच मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. किरकोळ अपघातानंतर ऑटोचालकाने लवू मामलेदार यांच्यावर हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर लॉजवर जाताना ते कोसळले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलला नेताना त्यांचा मृत्यू झाला आहे. ऑटोचालकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. लवू मामलेदार यांनी हॉटेलच्या तळघरात कार उभी करताना ऑटोचालक तेथे पोहोचतो. तोही तळघरात पोहोचतो. त्यानंतर हॉटेलसमोर येऊन लवू यांच्यावर तो हल्ला करतो. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडवून घेऊन लॉजमध्ये पाठवताना रिसेप्शनजवळ ते कोसळतात. या संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.
दुर्दैवी घटना
घटनेची माहिती समजताच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. त्याचवेळी लवू मामलेदार यांची मुलगी अक्षता बेळगावला पोहोचली. राजू सेठ यांनी भेट घेऊन तिचे सांत्वन केले. ही घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी ऑटोचालकाला ताब्यात घेतले आहे. सखोल चौकशी करण्याची सूचना आपण केली आहे, असे सांगतानाच ऑटोचालकांनी संयमाने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकप्रतिनिधी-राजकीय नेत्यांची सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव
या घटनेची माहिती समजताच लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनीही सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून मलगौडा पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागाराला भेट देऊन डॉक्टरांशी व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नगरसेवक रवी साळुंखे, श्रेयस नाकाडी आदींनीही सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. लवू मामलेदार हे बेळगाव येथील अनेकांना परिचित होते. घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांच्या परिचितांनीही शवागाराबाहेर गर्दी केली.
वयाचाही विचार केला नाही...
लवू मामलेदार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ऑटोचालकाने त्यांच्या वयाचाही विचार केला नाही. आम्ही सोडवून घेतलो, ते ज्या ज्यावेळी बेळगावला यायचे, आमच्याच हॉटेलला यायचे. ऑटोचे नुकसान झाले असेल तर पोलीस स्थानकात चला, असे ते सांगत होते. तरीही ऑटोचालकाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणारे हॉटेल व्यवस्थापक अडव्याप्पा करलिंगन्नावर यांनी दिली.
पोलीस अधिकारीपदी बजावली होती सेवा
ऑटोचालकाच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले लवू मामलेदार हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी आमदार होते. ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारीही होते. मगो-भाजप युतीतर्फे 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली होती. ते विजयी झाले होते. काहीकाळ तृणमूल काँग्रेसमध्येही ते कार्यरत होते. 2022 च्या निवडणुकीत मडकई मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवार होते. पोलीस अधिकारी म्हणून पोलीस प्रशिक्षण केंद्र वाळपई, वास्को, गोवा राखीव पोलीस दल, वाहतूक विभाग, अमलीपदार्थ विरोधी विभाग अशा विविध विभागांमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. उपअधीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर चार वर्षे सेवा बाकी असतानाच त्यांनी निवृत्ती घेतली होती.
वडिलांचा मृतदेह पाहून दु:ख अनावर
शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लवू यांची मुलगी अक्षता बेळगावला पोहोचली. शवागारात आपल्या वडिलांचा मृतदेह पाहून तिला दु:ख अनावर झाले. लवू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांनी मार्केट पोलीस स्थानकाला जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून श्रद्धांजली
माजी आमदार लवू मामलेदार यांचा मारहाणीनंतर झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. या घटनेसंबंधी आपण जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली आहे. त्यांचा मृतदेह गोव्याला पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या घटनेने आपल्याला धक्का बसला आहे. कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, मृतात्म्याला सद्गती मिळो, असे सांगत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून लवू यांचा मृतदेह गोव्याला पाठविण्यात आला.