माजी क्रिकेटपटू सय्यद अबिद अली कालवश
वृत्तसंस्था / हैद्राबाद
भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलु तसेच जागतिक क्रिकेट क्षेत्रातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जाणारे सय्यद आबिद अली यांचे बुधवारी वयाच्या 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
आबिद अली यांचा जन्म हैद्राबादमध्ये झाला. 1967 ते 1974 या सात वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी 29 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. 1967 च्या डिसेंबरमध्ये आबिद अली यांनी अॅडलेडच्या मैदानावर पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाचे 6 गडी 55 धावांत बाद केले होते. भारतीय संघाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सय्यद आबिद अली यांनी अष्टपैलु कामगिरीचे दर्शन घडविले. सिडनीतील कसोटीत आबिद अली यांनी पहिल्या डावात 78 तर दुसऱ्या डावात 81 धावा झळकविल्या होत्या. 7 कसोटी सामन्यात त्यांनी गोलंदाजीत नवा चेंडू प्रथम हाताळला तसेच फलंदाजीत त्यांनी सलामीला फलंदाजी केली. आबिद अली यांनी 1968 साली न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामने, तर 1969 साली भारतात न्यूझीलंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांत तसेच 1971 साली विंडीज विरुद्ध दोन कसोटी सामने खेळले असून त्यांनी फलंदाजीत 1018 धावा तर गोलंदाजीत 47 गडी बाद केले. भारतीय क्रिकेट मंडळाने तसेच अनेक माझी क्रिकेटपटूंनी सय्यद आबिद अली यांना आदरांजली वाहिली.