For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बोरांचा भाजपप्रवेश

06:06 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बोरांचा भाजपप्रवेश
Advertisement

काँग्रेसमध्ये मोहभंग : आसाममध्ये पक्षाला बसणार फटका

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आसाम भाजप अध्यक्ष दिलिप सैकिया आणि भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तर शनिवारी बोरा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा देखील उपस्थित होते.

Advertisement

8 मार्चपर्यंत आत्मसन्मान आणि राज्याबद्दल राष्ट्रवादी भावना बाळगणारे जवळपास 50 टक्के काँग्रेस सदस्य भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा बोरा यांनी केला आहे. बोरा यांनी मागील सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु काँग्रेस नेतृत्वाने तो स्वीकारला नव्हता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोरा यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. काँग्रेस नेत्यांनी बोरा यांना स्वत:च्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची सूचना केली होती. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शर्मा हे बोरा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, जेथे त्यांनी बोरा यांच्या भाजपप्रवेशाबद्दल घोषणा केली होती.

काँग्रेसमधील अपमानाचा मुद्दा मी राहुल गांधींसमोर उपस्थित केला होता, तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्याला देखील अपमानित झाल्याचे वाटत असल्याचे सांगितले होते असा दावा बोरा यांनी केला होता. अशाप्रकारचा अपमान मी सहन करू शकत नसल्याचे बोरा यांनी म्हटले होते. आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर बोरा यांचा भाजपप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

Advertisement
Tags :

.