माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; अनेक क्षेत्रातून आदरांजली
महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री , माजी लोकसभा अध्यक्ष तसेच शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. आज पहाटे ३ वाजता मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते.
रायगडमधील नांदवी गावचे असणारे मनोहर जोशी हे शिक्षण आणि नोकरीनिमित्त तरुणवयात मुंबईत आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी मुद्द्यावरिल राजकारणाने ते प्रभावित होऊन ते राजकारणात ओढले गेले. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबांशी एकनिष्ठ राहीलेले मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर अनुयायी होते.
मनोहर जोशी यांनी शिवसेना- भाजप युती अंतर्गत 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. 2002 ते 2004 या काळात त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही काम पाहीले.
मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मनोहर जोशी यांना आदरांजली वाहताना शून्यातून विश्व निर्माण करणारे..कडवट महाराष्ट्र अभिमानी...अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले....मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! असे म्हटले आहे.