गोव्याचे माजी मुख्यमंत्री राणे यांच्याकडून अंबाबाईला सोन्याचे दागिने अर्पण
अंदाजे 30 लाख ऊपये मूल्य : दागिन्यांमध्ये नक्षीदार साज आणि दोन तोड्यांचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात 50 लाख ऊपयांचा सोन्याचा सिंह दाखल होऊन आठच दिवस होताहेत तोवर शुक्रवारी 30 लाख ऊपये किंमतीचे सोन्याचे दागिने जमा झाले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे यांनी 30 लाख ऊपयांचे नक्षीदार सोन्याचे दागिने अंबाबाई देवीला अर्पण केले. या दागिन्यांमध्ये एक दोन पदरी साज व दोन तोड्यांचा समावेश आहे.
साज व तोड्यांना केलेले नक्षीकाम अप्रतिम म्हणावे असेच आहे. साजाचे वजन अंदाजे 168.450 मिली ग्रॅम तर दोन तोड्यांचे वजन 200.590 मिली ग्रॅम इतके आहे. यापैकी साजाची किंमत अंदाजे 13 लाख 76 हजार 750 आणि दोन तोड्यांची किंमत अंदाजे 16 लाख 34 हजार 267 ऊपये इतकी आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव विश्वजीत राणे हे दोन्ही प्रकारचे सोन्याचे दागिने घेऊन शुक्रवारी अंबाबाई मंदिरामध्ये आले होते. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे दागिने सुपूर्द केले. समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी हे दागिने स्वीकाऊन राणे कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर दागिन्यांचे विधिवत पूजन केल्यानंतर लगेचच अंबाबाईच्या मूर्तीला साज घालण्यात आला. पुढील अलंकार पूजेवेळी दोन तोडे देखील अंबाबाईच्या मूर्तीला घालण्यात येतील, असे अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.