माजी वायुदलप्रमुख भदौरियांचा भाजपप्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भदौरिया यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. भदौरिया हे उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत.
भदौरिया यांच्यासोबत तिरुपतीचे माजी खासदार आणि निवृत्त आयएएस अधिकारी बराप्रसाद राव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भदौरिया यांनी वायुदलात कार्यरत असताना 4315 तासांचे उ•ाण केले आहे. आत्मनिर्भर भारतासाठीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभियानात भदौरिया हे सक्रीय सहभागी होते असे उद्गार तावडे यांनी यावेळी काढले आहेत.
संरक्षण दलाच्या गणवेशात लोकांना पाहिल्यावर मोठी प्रेरणा मिळते. सुरक्षित भारताची कल्पना करताना लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आशेने पाहत असतात. विकसित भारत, सुरक्षित भारत हे मोदींच्या नेतृत्वातच शक्य आहे. देशाला सुरक्षित करण्यासाठी भदौरिया यांच्यासारख्या अनेक जणांनी दीर्घकाळ सेवा बजावली आहे. वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्वीच्या सरकारांनी पूर्ण केली नव्हती. मोदींनी 2014 मध्ये याचे आश्वासन दिले आणि वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्ण देखील केली. कलम 370 हद्दपार करत मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली असून समृद्धी आणली आहे. पूर्ण देशाचे संरक्षण उत्पादन अत्यंत कमी होते. परंतु आता देशात मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन होत असून त्याची निर्यात देखील केली जात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
भाजपचे सदस्यत्व घेण्याची संधी दिल्याने आणि पुन्हा देशाची सेवा करता येणार असल्याचे मी भाजप नेत्यांचे आभार मानतो. मोदी सरकारने भारतीय सैन्याला सशक्त करण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे आमच्या संरक्षण दलांची क्षमता वाढली असून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल देखील सुरू झाली आहे. याचे आता परिणाम देखील दिसून येत असल्याचे भदौरिया यांनी म्हटले आहे.