इंडिया ड चा औपचारिक विजय
अर्शदीप सिंग : 40 धावांत 6 बळी
वृत्तसंस्था/ अनंतपूर
2024 च्या क्रिकेट हंगामातील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात इंडिया ड ने इंडिया ब चा 257 धावांनी दणदणीत पराभव केला. इंडिया ड संघातील अर्शदीप सिंगने 40 धावांत 6 गडी बाद केले. या विजयामुळे इंडिया ड ने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 गुण मिळविले. पण इंडिया अ ने या स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधिक 12 गुण नोंदवित पटकाविल्याने इंडिया ड चा हा विजय औपचारिक ठरला.
या सामन्यात इंडिया ड ने पहिल्या डावात 349 धावा जमविल्यानंतर इंडिया ब चा पहिला डाव 282 धावांत आटोपला. इंडिया ड ने पहिल्या डावात 67 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंडिया ड ने दुसऱ्या डावात 305 धावा जमवित इंडिया ब ला निर्णायक विजयासाठी 70 षटकात 373 धावांचे आव्हान दिले. पण इंडिया ब चा दुसरा डाव 22.2 षटकात 115 धावांत आटोपला. इंडिया ड संघातील अर्शदीप सिंगने 40 धावांत 6 गडी बाद केले. इंडिया ड संघाच्या दुसऱ्या डावामध्ये रिकी भूईने 119 तर श्रेयस अय्यरने 50 धावा जमविल्या. या सामन्यातील भूईचे हे सलग दुसरे शतक आहे.
संक्षिप्त धावफलक - इंडिया ड प. डाव 349, इंडिया ब प. डाव 282, इंडिया ड दु. डाव 58.3 षटकात सर्वबाद 305, इंडिया ब दु. डाव 22.2 षटकात सर्वबाद 115.