For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊर्जा प्रकल्पाभवती मानवी साखळी तयार करा

06:18 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊर्जा प्रकल्पाभवती मानवी साखळी तयार करा
Advertisement

ट्रम्प यांच्या धमकीदरम्यान इराणचे लोकांना आवाहन

Advertisement

इराण शस्त्रसंधीस तयार न झाल्यास तेथे एकही पूल अन् ऊर्जा प्रकल्प शिल्लक राहणार नाही आणि इराण अश्मयुगात पोहोचेल अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांची धमकी पाहता इराण सरकारने स्वत:च्या जनतेला आवाहन केले आहे. युवावर्गाने मुख्य ऊर्जा प्रकल्पाच्या चहुबाजूला मानवी साखळी निर्माण करावी असे इराणच्या क्रीडा मंत्रालयाने युवा अॅथलिट आणि क्रीडापटूंसोबत कलाकार तसेच विद्यार्थ्यांना केले आहे.

इराणच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची डेडलाइन बुधवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत आहे. मानवी साखळी निर्माण करण्याचा विचार युवांनीच दिला आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये शिकणारे युवा, विद्यार्थी आणि कलाकारांनी मिळून एकतेचे प्रदर्शन करावे. हे एकप्रकारचे प्रतिकात्मक प्रदर्शन असेल. देशाचे युवा स्वत:च्या संपत्तीचे रक्षण करू इच्छितात आणि उज्ज्वल भविष्य इच्छितात हे प्रदर्शित करावे लागेल असे इराणच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

युद्धगुन्ह्याची चिंता नाही

ट्रम्प यांनी इराणचे पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना नष्ट करण्याची धमकी देत मला युद्धगुन्ह्यांची किंचितही फिकिर नाही असे म्हटले आहे. इराणने मंगळवारी रात्री (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार) 8 वाजेपर्यंत आत्मसमर्पण न केल्यास इराणच्या नागरी मूलभूत सुविधांवर हल्ले केले जातील अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवार अन् बुधवारी सर्वाधिक हल्ले होतील असा दावा केला आहे.

इराणने फेटाळला प्रस्ताव

यापूर्वी इराणने 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळत युद्धाचा स्थायी अंत इच्छित असल्याची भूमिका मांडली होती. पूर्ण देशावर एकाच रात्रीत कब्जा केला जाऊ शकतो आणि ती रात्र बुधवारची असू शकते असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पाकिस्तानचा शांती प्रस्ताव बारगळला

ट्रम्प यांनी इराणला युद्धविरामासाठी दिलेली कालमर्यादा मंगळवारी रात्री (अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार) 8 वाजेपर्यंत आहे. या कालमर्यादेत होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग पुन्हा खुला न केल्यास इराणला ऊर्जा प्रकल्प आणि पूलांवरील हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तर इराणने युद्धविरामाविषयी पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला स्वत:चे उत्तर कळविले आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि इराणदरम्यान 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव दोन टप्प्यांमध्ये राबविण्याची तरतूद होती. पहिल्या टप्प्यात 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव होता, 45 दिवसांमध्ये चर्चेत प्रगती दिसून आल्यास हा कालावधी आणखी वाढविला जाऊ शकतो असे म्हटले गेले होते. परंतु या अस्थायी युद्धविराम प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नकार दिला आहे. तर इराणने देखील पाकिस्तानद्वारे प्राप्त प्रस्ताव फेटाळला आहे.

इराणला हवी आहे हमी

-आम्ही केवळ युद्धविराम स्वीकारणार नाही. पुन्हा हल्ला न होण्याची हमी दिल्यास आम्ही युद्धाची समाप्ती स्वीकारू अशी इराणची भूमिका.

-इराण अन् ओमानचे अधिकारी होर्मुझ सामुद्रधुनीच्या जलमार्गाच्या प्रशासनाकरता व्यवस्था विकसित करण्यावर काम करत असल्याची टिप्पणी.

-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली कालमर्यादा संपण्यापूर्वी मध्यस्थांकडून युद्धविरामाचा नवा प्रस्ताव इराणसमोर मांडण्यात आला आहे.

-अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान इराणकडून नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप.

3 मुस्लीम देशांची मध्यस्थी विफळ

-3 मुस्लीम देशांकडून तयार योजना रविवारी रात्री उशिरा अमेरिका आणि इराणसमोर मांडण्यात आली होती.

-इराणचे ऊर्जा प्रकल्प अन् पायाभूत सुविधांवरील मोठे हल्ले रोखण्याचा हा अंतिम प्रयत्न मानला जात होता.

-पाकिस्तान, इजिप्त, तुर्किये हे देश अमेरिका आणि इराणदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

-युद्धविरामाचा नवा प्रस्ताव इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत विटकॉफ यांना पाठविण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.