ईश्वराचा विसर पडणं घातक ठरू शकतं
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, माणसाला कायम सुखात राहण्याची इच्छा असते. ते सुख मिळवण्यासाठी परिस्थिती सदैव अनुकूल रहावी अशी त्याची इच्छा असते. बाह्य वस्तूतून सुख मिळते असे त्याला वाटत असल्याने त्या मिळवण्याची त्याला सतत इच्छा होत असते. हव्या असलेल्या वस्तू मिळवण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. जोपर्यंत त्या मिळत जातात तोपर्यंत तो शांत असतो पण परिस्थिती कायम अनुकूल असतेच असं नाही. त्यामुळे आपल्याला हव्या त्या वस्तू मिळत नाहीत असं लक्षात आलं की, त्याला राग येऊ लागतो. हे घडू नये म्हणून त्याने देहबुद्धी टाकून द्यावी ह्या अर्थाचा कारणे सति कामस्य क्रोधस्य सहते च यऽ । तौ जेतुं वर्ष्मविरहात्स सुखं चिरमश्नुते ।। 23 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. एकदा माणसाला राग अनावर झाला की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो. त्यामुळे करू नयेत ती कृत्ये तो करू लागतो. अशावेळी बळावलेला रजोगुण त्याला काम आणि क्रोधाची शिकार बनवतो. त्याला चूक काय बरोबर काय हेही कळायचं बंद होतं. हळूहळू त्याच्यावर तमोगुणाचा प्रभावही वाढू लागतो. हट्टी स्वभावामुळे त्याला मी करतोय तेच बरोबर आहे असं वाटू लागतं. असं चुकीचं वागणं हातून घडू नये म्हणून माणसाने सदैव ईश्वरस्मरण करावे म्हणजे त्याचा सत्वगुण वाढू लागतो आणि तो रज व तम गुणाचा प्रभाव कमी करतो.
नाथ महाराजांची भारुडे फार प्रसिद्ध आहेत. भारूडातून ते माणसाने कसे वागावे म्हणजे त्याचा उद्धार होईल ह्याबद्दल उपदेश करतात. त्यांची विंचू चावला ही रचना लोकप्रिय आहे. त्यात ते म्हणतात, काम, क्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला । त्याने माझा प्राण चालिला । म्हणून त्याला उतारा म्हणून तमोगुण मागे सारा । त्यासाठी सत्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरा ।अवघा सारिला तमोगुणकिंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने ।माणसाने कितीही प्रयत्न केले तरी तमोगुण लवकर दाद देत नाही. कारण माणसाला कायम आपलंच बरोबर आहे असं वाटत असतं. म्हणून शेवटी सद्गुरुना शरण गेले की ते तमोगुणाची राहिलेली फुणफुण दूर करतात.
आता मूळ विवेचनाकडे वळू. निरनिराळ्या संतांच्या विचारातून, धर्मग्रंथांच्या वाचनातून हे लक्षात येतं की, इच्छा, वासना यांच्या पूर्तीच्या प्रयत्नात मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो आणि म्हणून त्या पूर्ण होईना झाल्या की त्याला राग येऊ लागतो. माणसानं स्वत:ला कर्ता समजू लागणं हे देहबुद्धीचं आणि देहाभिमानाचं लक्षण आहे असं झालं की मी बळावतो आणि ईश्वराचा विसर पडतो. म्हणून ईश्वराचा विसर पडणं कधीही घातक ठरू शकतं. याउलट ज्याला सदैव ईश्वराची आठवण येत असते तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने काम, क्रोध यांच्यावर विजय मिळवून सदैव सुखी राहतो. एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे म्हणजे त्यागोष्टी स्वत:च्या हितासाठी वापरता येणे ज्याअर्थी काम, क्रोध इत्यादि ईश्वराने दिले आहेत त्याअर्थी ते आवश्यक आहेत. माणसाने नेहमी चांगल्या इच्छा, कामना कराव्यात, त्यांच्याबद्दल मोह बाळगावा, त्या पूर्ण करण्यात तो कुठं कमी पडत असेल तर त्याला स्वत:चाच राग यावा. जेणेकरून त्याच्या चांगल्या इच्छांची परमेश्वर कृपेनं पूर्तता व्हावी.
ईश्वराच्या कर्ता करविता असण्याचा जेव्हा विसर पडतो तेव्हा राग, लोभ, काम, क्रोध, मोह आणि मत्सर हे षड्रिपु त्याच्यावर स्वार होतात. त्यामुळे त्याचे विचारचक्र उलटसुलट फिरू लागते आणि त्यातूनच त्याच्या हातून वेडीवाकडी कृत्ये होतात आणि त्यामुळे तो अध:पतित होऊन नरकात जातो. म्हणून माणसानं सदैव ईश्वर स्मरणात रहावं म्हणजे त्याला षड्रिपुंवर विजय मिळवता येतो आणि ते त्याच्या अंमलाखाली काम करतात. त्यामुळे त्याला ब्रम्हप्राप्ती होते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.