कास रोडवर वणव्यात वनसंपदा जळून खाक
कास :
निसर्ग संपदेने नटलेल्या सातारा-कास रोड परिसरात समाज कंटकांकडून वणवा लावण्याचे प्रकार सातत्याने या परिसरात सुरू आहेत. सर्व डोंगरारांगा जळून खाक झाल्याने काळ्या कुट्ट दिसत आहेत. सोमवारी दुपारी पारांबे देवकल गावच्या हद्दीत लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टरवरील क्षेत्र जळून खाक झाले. यात ओली जिवंत झाडेडी जळून कोसळली. काही झाडे मध्यरात्री रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा ठरत होती.
वन विभागाकडून वणवा लावू नये म्हणून जनजागृती व जाळ पट्टा केला जातो. मात्र दरवर्षी काही ठरावीक भाग परिसर वगळता वणवा लागला नाही, असे क्षेत्रच शिल्लक राहत नाही. त्यामुळे वणवा रोखणार तरी कोण आणि तो कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोमवारी दुपारी कास रोडलगत असणाऱ्या पारांबे देवकल गावच्या हद्दीत वणवा लागला होता. सर्वत्र आगीचे लोट धुराचा डोंब उसळला होता. या आगीत मालकी व वनक्षेत्रातील वनसपंदा जळून खाक झाली. ओली झाडेही जळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे सातारा कास रोडवरील वाहतूक मंगळवारी सकाळी काही वेळ खोळंबली होती. वनसमितीचे प्रयत्न अपुरे पडले.