अरण्यऋषि
प्रकृती आणि प्राणीमात्रांचे अंतरंग जाणणारे, जंगलाचा आत्मा अनुभवणारे आणि तो शब्दांमधून लोकांसमोर खुला करणारे अरण्यऋषि... मारुती चितमपल्ली! पद्मश्री, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘अरण्यऋषि‘ चितमपल्ली हे केवळ लेखक किंवा वनखात्याचे अधिकारी नव्हते, तर एक जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, अभ्यासक, शिक्षक, संस्कृतीचे पुरस्कर्ते आणि एक सच्चे भारतीय विचारवंत होते. 5 नोव्हेंबर 1932 रोजी जन्मलेल्या चितमपल्ली यांचे लहानपणापासूनच निसर्गाशी अनोखे नाते जुळले. गावरान वातावरण, जंगल, प्राणी, पक्षी, औषधी वनस्पती यांच्या सहवासात ते लहानाचे मोठे झाले. शिक्षणासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्र आणि प्राणिशास्त्रात पदवी घेतली. पुढे त्यांनी वनसेवा निवडून महाराष्ट्र वन विभागात वनसंरक्षक आणि वन्यजीव तज्ञ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपल्या सेवा-कार्यकाळात महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगाव अशा जंगलांचं अनुभवसंपन्न निरीक्षण केलं. त्यांचं एक वैशिष्ट्या म्हणजे त्यांनी शास्त्राrय अभ्यासाला लोकपरंपरा, लोककथा आणि स्थानिक ज्ञानाशी जोडून पाहिलं. त्यामुळे जंगलातील माणसांचा दृष्टिकोन, प्राण्यांचं आचारशास्त्र, त्यांच्या सवयी, त्यांचं स्थानिक नावं हे सारे त्यांच्या लेखनातून जिवंत होत गेले. शिवाय एक शाश्वत विचार ते कायम मांडत राहिले. तो म्हणजे, ‘निसर्गाचे संरक्षण हे केवळ सरकारी जबाबदारी नव्हे, तर प्रत्येक मनुष्याचे नैतिक कर्तव्य आहे!’ चितमपल्ली हे निसर्गलेखनाचे एक अद्वितीय शिल्पकार होते. त्यांच्या लेखनात शाब्दिक नजाकत नसून अनुभवसंपन्नता असते. वाचकाला जंगलात नेणारी आणि त्या जंगलातील प्रत्येक सजीवाशी संवाद घडवणारी त्यांची साहित्यिक ओळख त्यांच्या रानवाटा, प्राण्यांची शाळा, रातवा, झाडांच्या आठवणी, माझे अरण्य, कळसासुर, वटवृक्षाखाली यांसारख्या पुस्तकांतून झाली. त्यांनी एकूण 50 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली असून ती पर्यावरण व निसर्गशास्त्रावर आधारित आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून मुलांसाठी विशेष आकर्षण असलेली शैली दिसते जिथे प्राणी-पक्ष्यांचं मानवीकरण न करता त्यांचा स्वाभाविक आविष्कार स्वीकारला जातो. वादापासून स्वत:ला कटाक्षाने बाजूला ठेवणारे चितमपल्ली आपल्या जंगलातील निरीक्षणांशी मात्र नेहमीच प्रामाणिक राहिले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तरी कविकल्पनांना त्यांनी तिथंपर्यंतच मर्यादित ठेवले. पक्षांमध्ये गानकोकिळा नसते तर गानकोकिळ असतो. ही माहिती तर साहित्यच नव्हे तर कलेतील मंडळींनाही न पचणारी. चकोर चांदणे पितो ही दुसरी कल्पना पण, हा चकोर वास्तवात रात्रीच्या वेळी किडे खातो. पिढ्यानपिढ्या धरणांना धक्का देणारी ही निरीक्षणे. प्रस्थापित समाजाला हे मान्य होणार नाही म्हणून त्यांनी ती मांडायची सोडली नाहीत. पण, त्यावर जोर देऊन तो विचार रुजविण्याचा प्रयत्न न करता ती जबाबदारी काळावर सोपवून टाकली! वादाला प्रतिवादाने उत्तर हा साहित्यिक गुणधर्म कदाचित अरण्यातील शांत जीवनशैलीने त्यांच्यातून नष्ट केला असावा. या अरण्याच्या एकाबाजूने मोहक, दुसऱ्या बाजूने हिंस्त्र शांततेत ते आयुष्यभर निरीक्षण करीत राहिले. दिवसभर अधिकारी म्हणून या जंगलात निरीक्षण करत राहायचे आणि पहाटे उठून सरकारी नोकरीची वेळ होईपर्यंत लिहित बसायचे असे आयुष्यभर ते जगले. पारंपरिक भारतीय दृष्टिकोनातून पर्यावरणाकडे पाहणारे त्यांचे विचार त्यांना आजच्या काळातील मंडळींपासून दूर राखणारे असतील. मात्र निसर्ग म्हणजे केवळ जैवविविधता नव्हे तर ती त्यांना एक आध्यात्मिक अनुभूती वाटे. ‘वृक्ष, नद्या, पर्वत, आणि प्राणी हे आपल्या संस्कृतीचे भाग आहेत’ हे वारंवार सांगणारे चितमपल्ली आपल्या काळाशी, विचारांशी आणि अनुभवांशी प्रामाणिक राहिले. त्यांनी भारतीय संस्कृतीतील पर्यावरणस्नेही तत्त्वांचा अभ्यास करून ते लेखनातही प्रतिबिंबित केलं. वनसेवेच्या कार्यकाळात पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान यांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी वन्यजीव शास्त्राचे नियम स्थानिक आचारधर्माशी जुळवून प्रभावी संरक्षण धोरणे राबवली. जी अधिक वास्तवदर्शी विचार मांडणारी होती. त्यांची एक विशेष कामगिरी म्हणजे, पक्षी निरीक्षण आणि त्यांची ओळख यांचे संकलन. भारतातील स्थानिक पक्ष्यांच्या बोली आणि त्यांच्या नोंदी जतन करण्याचे अनोखे कार्य त्यांनी हाती घेतले, जे आजही अभ्यासकांसाठी एक मौल्यवान स्रोत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत साहित्य अकादमी पुरस्कार (2017), निसर्ग साहित्य पुरस्कार, मराठी विज्ञान परिषद पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा वनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या निसर्गप्रेमी समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा मृत्यू म्हणजे शब्दांनी जंगल उलगडणारा ऋषी गेला, असा हळहळीत उल्लेख अनेक मान्यवरांनी केला तो त्यामुळेच. चितमपल्ली यांनी जे विचार बीजाप्रमाणे पेरले निसर्ग आणि मानवी जीवन यांचा सखोल सहसंबंध, संवेदनशील पर्यावरण शिक्षण, आणि लोकसंस्कृतीशी संलग्न जैवविविधता संरक्षण याचा विचार मांडला तो पिढ्यांसाठी दिशा देईल. त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून एक प्रकारचं आधुनिक पर्यावरणीय मात्र परंपरेला जोडून घेणारं धर्म-शास्त्रच तयार झालं आहे, जे आजच्या हवामान बदलाच्या संकटात अधिकच महत्त्वाचं ठरतं. आयुष्याच्या अखेरच्या काळात ते सोलापूर जवळ एका खेड्यात स्थिरावले. अरण्यातील शांततेचा आयुष्यभर सकारात्मक उपयोग करून घेतल्यामुळे असेल कदाचित. मात्र, आयुष्याच्या अखेरीसही महाभारतात वर्णन आलेली झाडे आणि आज आढळणारी झाडे याच्यावर ते संशोधन करत होते. आपल्या आयुष्यातील ही अखेरचे पर्व त्यांनी आपल्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि त्या संस्कृतीच्या पारंब्या आधुनिक काळाच्या मातीत रुजवण्यासाठी खर्ची घातले. आयुष्यभर असे न बोलता, गाजावाजा न करता ते साहित्य आणि संस्कृतीचे अरण्यही संपन्न करत राहिले. या वाटेने जाणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांनी दाखवलेली दिशा आणि त्यांच्याकडे आलेली विज्ञानाची शक्ती याचा मिलाफ करून काही अधिक मौलिक जगासमोर मांडता आले तर या ऋषींच्या कार्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले असे म्हणता येईल. त्यादृष्टीने मराठी साहित्यातील पुढची पिढी हा वारसा पुढे नेईल तीच त्यांना श्रद्धांजली.