गुजरातमध्ये वन अधिकाऱ्याकडून पत्नी अन् दोन मुलांची हत्या
भावनगर : गुजरातमध्ये एका वन अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुले रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाले होते. हे प्रकरण आता सुनियोजित हत्येचा कट असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी वन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्याने स्वत:च्या निवासस्थानानजीक खड्डा खणून तिघांचे मृतदेह पुरले होते. सहाय्यक वन संरक्षक (एसीएफ) 39 वर्षीय शैलेश खंभला याने पत्नीसोबतच्या कौटुंबिक वादानंतर या हत्या केल्याचे समजते. आरोपीने पत्नी आणि मुलांची गळा दाबून हत्या केली होती. पत्नी 42 वर्षीय नयना, 9 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा मृतदेह आरोपीने फॉरेस्ट कॉलनीतील स्वत:च्या अधिकृत निवासस्थानानजीक 6 फूट खोल खड्डा खणून पुरले होते. हे मृतदेह आढळून आल्यावर शैलेश खंभला याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान बेपत्ता पत्नी आणि मुलांबद्दल त्याने कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केली नव्हती, तसेच त्याच्या जबाबात विसंगती आढळून आल्या होत्या, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.