मोती तलावातील मगरींना जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू मोहीम
सावंतवाडी -
येथील मोती तलावात मगरीचे वास्तव्य असल्याने तिला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम गेले दोन दिवस मोहीम राबवित आहे. मोती तलावात गणपतींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नगरपालिका प्रशासन व वनविभागाच्या रेस्क्यू टीमने मगरीला जेरबंद करण्यासाठी शुक्रवारपासून मोती तलावात मोहीम सुरू केली आहे. मोती तलावात मगरीचे वास्तव्य असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मागील एक महिन्यापूर्वी केशवसुत कट्टा या परिसरातील भागात मगरीचे दर्शन झाले होते. त्यानंतर मगरीने मोती तलावात सुरू असलेल्या नवीन संगीत कारंजाच्या ठिकाणी वास्तव्य केले. गेले दोन दिवस कारंजाच्या ठिकाणी मगर दृष्टीस पडली. काहीजण कपडे तर हात पाय धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरतात त्यामुळे मगरीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पुढील गणेश उत्सव कालावधीत दीड दिवसापासून ते एकविसाव्या दिवसापर्यंत गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे.शुक्रवारपासून वनविभागाची आठ जणांच्या रेस्क्यू टीमने मगरीला रेस्क्यू करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. रेस्क्यू टीमचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात येत आहे.