For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोती तलावातील थरार संपला !

01:01 PM Sep 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मोती तलावातील थरार संपला
Advertisement

गणेशोत्सवातील भीती दूर, पाच फूटी मगरीला पकडण्यात वनविभागाला यश

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत सावंतवाडीच्या मोती तलावात दर्शन देणाऱ्या मगरीमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण अखेर संपले आहे. तब्बल पाच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला या पाच फूटी मगरीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे मोती तलावाच्या काठावरील आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.गेले काही दिवस सावंतवाडीतील लोकांमध्ये या मगरीमुळे चिंतेचे वातावरण होते. विशेषतः गणेश चतुर्थीच्या काळात ही मगर संगीत कारंजाजवळ येऊन दर्शन देत असल्यामुळे विसर्जनस्थळी मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी या मगरीला तात्काळ पकडण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन वनविभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली.वनविभागाच्या जलद कृती दलाने मोती तलावात मगरीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत दोनदा मगरीने संगीत कारंजावर येऊन सर्वांना चकवले. त्यामुळे रेस्क्यू टीमसाठी ही मोहीम एक मोठे आव्हान बनली होती. मात्र, आज लावलेल्या तिसऱ्या सापळ्यात ही पाच फुटी मगर अखेर अडकली आणि वनविभागाच्या टीमला यश मिळाले.मगर पकडल्यानंतर तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथक प्रमुख बबन रेडकर यांच्यासह प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब आणि राकेशअमृसकर आदींच्या पथकाने ही यशस्वी मोहीम पार पाडली.यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले की, “गणेशोत्सवातील विसर्जनवेळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते, त्यामुळे ही मगर पकडणे आवश्यक होते.” जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर म्हणाले की, “पाणी जास्त असल्यामुळे आम्हाला विलंब झाला, पण आजच्या सापळ्यात ती अडकली. ही आम्ही रेस्क्यू केलेली ३६४ वी मगर आहे.” मगर पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोती तलावाजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सुटकेचा भाव स्पष्टपणे दिसत होता. या मगरीला आता तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.