विदेशी पर्यटकांचे स्वागत होणार गोमंतकीय संस्कृतीने!
एक कोटी खर्चाची निविदा जारी : पर्यटकांना कोकम सरबतही देण्याची योजना
पणजी : यंदाच्या पर्यटन हंगामात चार्टरने येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी रु. 1 कोटी खर्च करण्याचे पर्यटन खात्याने ठरविले असून त्यासाठी आता कंपनीचा शोध सुरू करण्यात आला आहे. गोव्याची संस्कृती सातासमुद्रापार जावी आणि त्याची ओळख पर्यटकांना व्हावी म्हणून आता त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. मोपा आणि दाबोळी या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना गोव्याचे पारंपरिक दर्शन घडवण्याचा पर्यटन खात्याचा बेत आहे. गोव्याची कला-संस्कृती दाखवणे आणि त्याची स्तुती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे तसेच त्यातून पर्यटन वाढवणे असे अनेक हेतू त्यामागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पारंपरिक स्वागतामध्ये घोडेमोडणी, गोफ, जागोर आणि इतर लोकनृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्रुझ बोटीतून येणाऱ्या पर्यटकांना हे स्वागत पहायला मिळणार आहे. किंग मोमो, क्विन मोमो, सांतक्लॉज अशा पारंपरिक प्रासंगिक पोषाखातूनही त्याचे स्वागत होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोकम सरबत देण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. पारंपरिक स्वागत करण्यासाठी कंपनी नेमण्याची प्रक्रिया पर्यटन खात्याने सुरू केली आहे. गोव्यात येताच पर्यटकांना राज्यातील कला संस्कृतीचे दर्शन घडावे हा त्यामागील हेतू आहे. तसेच गोवा हे कला-संस्कृतीचे पर्यटन केंद्र स्थळ आहे. अशी ओळख जगभर आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी अशी त्यामागील भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले.