आयात शुल्काच्या घटीनंतर सोन्याचा विदेशी पुरवठा वाढला
सोने आयात तिपटीने वाढली : पुन्हा सणांमध्ये मागणी वाढण्याचे संकेत
नवी दिल्ली :
देशातील सोन्याच्या किमती एका महिन्यात 4.2 टक्क्यांनी (रु. 2,985/ ग्रॅम) वाढून रु. 74,093 प्रति दहा ग्रॅम वर आल्या आहेत. अर्थसंकल्पात आयात शुल्काच्या घटीनंतर किंमत कमी होण्यापेक्षा अधिक वाढली आहे. असे असले तरी सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी विक्रमी होईल, असे तज्ञांचे मत आहे. आयात शुल्क हटवल्यामुळे विदेशातून सोने मागवणे सोपे झाले. ते देशातील सर्व ज्वेलर्सपर्यंत पोहोचत आहे. एका अंदाजानुसार, सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी 30 टक्क्यांहून अधिक वाढेल असे सांगितले आहे. अर्थसंकल्पात सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर ऑगस्टमध्ये भारताच्या सोन्याच्या आयातीत तिपटीने वाढ झाली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जुलैमध्ये 3.13 अब्ज डॉलर (रु. 26,276.35 कोटी) च्या तुलनेत ऑगस्टमध्ये मासिक आधारावर 10.06 अब्ज डॉलर (रु. 84,453.7 कोटी) आयात झाली. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे सणासुदीचा काळ. त्यामुळे मोठी मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्के होते, जे बजेटमध्ये 6 टक्के करण्यात आले.
सणासुदीत सोन्याची मागणी वाढणार
मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेतील किमतीच्या हालचालींमुळे सणासुदीत सोन्याची मागणी जास्त राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचे कारण असे की, आता बहुतांश सोने वैध मार्गाने भारतात येणार आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विपुल शाह म्हणाले, ‘आयात शुल्कामुळे विदेशी सोन्याचे उत्पन्न वाढले आहे.‘
डिसेंबरपर्यंत 42 लाख विवाहसोहळे
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या मते, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 42 लाख विवाहसोहळे होतील. यामध्ये सुमारे 5.5 लाख कोटी खर्च होतील, असा अंदाज आहे. इतर गोष्टींच्या तुलनेत सोन्यासाठी खर्च वाढलेला दिसेल.
गोल्ड ईटीएफची मागणी वाढली
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील गुंतवणूकही वाढत आहे. देशातील ईटीएफ सोन्याचा निव्वळ प्रवाह जुलैमध्ये 80 टक्क्यांनी वाढून 13,400 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या महिन्यात एकूण गुंतवणूक 14,600 कोटी रुपये झाली आहे. मात्र 1200 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.
ईटीएफमध्ये फेब्रुवारी 2020 नंतर साडेचार वर्षांतील ही सर्वात मोठी एकाच महिन्याची गुंतवणूक आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार सोन्यात गुंतवणुकीचा कल यापुढेही कायम राहील. आरबीआयने ऑगस्टपर्यंत 8.2 टन सोन्याची खरेदी केली असून संपूर्ण वर्षभरात बँकेची खरेदी 44.3 टन होती. दोन वर्षांतील हा उच्चांक आहे. आरबीआयकडे सद्यस्थितीत एकूण सोने 849 टन आहे.