परराष्ट्र सचिवांची चीन भेट : सर्वसमावेशक द्विपक्षीय भागीदारीचे नवयुग
विक्रम मिस्री यांचा चीन दौरा जगातील ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्यपूर्वेतील तणाव असो किंवा युक्रेन-रशियातील तणाव असो या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियात भारत व चीन यांच्या दरम्यान शांतता व सौहार्द भाव टिकून राहणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण दक्षिण आशियातील सामुदायिक विकासाची प्रक्रिया ही या दोन महासत्तामधील शांततापूर्ण सहजीवनात आहे. 1950 साली सुरू झालेल्या राजकीय संबंधाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध पूर्ववत सुरळीत करण्याच्या दृष्टीने भारताचे विदेश सचीव विक्रम मिस्री यांची बीजिंग भेट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. उभय देशातील सांस्कृतिक आणि राजकीय संबंध अधिक सौहार्दपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने मिस्री यांचा हा दौरा निश्चितपणे निर्णायक ठरला आहे. मिस्री यांनी त्यांचे समपदस्थ चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर सौहार्दपूर्ण चर्चा केली तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश होतो. उभय नेत्यांमधील चर्चेचे सूत्र प्रामुख्याने तीन बिंदूंवर आधारलेले होते.
पहिले म्हणजे मिस्री स्वत: चीनमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांचा चीनमधील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क आहे व त्यांच्या क्षमता व मर्यादा यांचे त्यांना ज्ञान व भान आहे. दुसरे म्हणजे गलवान सीमेवर झालेल्या संघर्षानंतर उभय राष्ट्रातील ताणलेले संबंध पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी बोलणी केली आहेत. तिसरे म्हणजे 75 वर्षे उभय राष्ट्रातील राजकीय संबंधांना पूर्ण होत असताना वातावरण सौहार्दपूर्ण व ऊबदार बनविणे हा त्या मागचा हेतू होता. या तिन्ही हेतूंच्या पूर्ततेसाठी त्यांनी केलेला दौरा लक्षणीयदृष्ट्या यशस्वी ठरला आहे.
थोडा पूर्व इतिहास?
1950 ते 1960 या दशकात भारत-चीन संबंध पंचशील तत्त्वावर आधारलेले होते. ‘हिंदी चिनी भाई भाई’ या घोषणेने या संबंधाचे वर्णन केले जात असे. नेहरू युगातील भारताच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन 1962 साली चीनने भारतावर कडाक्याच्या हिवाळ्यात आक्रमण केले. भारतीय लष्कराने शिकस्त केली. 45000 चौ. कि.मी. एवढा भारताचा प्रदेश चीनने हडप केला. त्यानंतर उभय देशातील संबंध ताणलेले राहिले. परंतु संबंधात सुधारणा होत गेली. 2019 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताने 14 सैनिक गमावले आणि प्रत्युत्तर म्हणून चीनच्या 42 सैनिकांना भारताने यमसदनास पाठविले. त्यानंतर सीमेवरचा तणाव वाढतच होता. अखेर सीमेवरील सैन्य वापसीचा निर्णय घेण्यात आला. कझान, रशिया येथे झालेल्या 16 व्या ब्रिक्स परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली व त्यानंतर शांतता प्रक्रियेला गती प्राप्त झाली. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी डिसेंबर महिन्यात बीजिंगला भेट देऊन चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि सीमेवर शांतता प्रस्थापित झाली.
मिस्री भेटीचे महत्त्व?
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या बीजिंग भेटीचे महत्त्व असे आहे की, विक्रम मिस्री हे ज्येष्ठ परराष्ट्र सचिव असून ते यापूर्वी चीनमध्ये भारताचे राजदूत होते आणि त्यांना चीनमधील जुन्या, जाणत्या, मुरब्बी नेत्यांची चांगली ओळख आहे. त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा या भेटीमध्ये झाला आहे. परराष्ट्र धोरण ठरविणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षातील पॉलीट ब्युरो सदस्यांचीही त्यांनी भेट घेतली. भारत-चीन मुलभूत सिद्धांतावर आधारित परस्पर समज व मैत्री वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न या दौऱ्यामुळे शक्य झाला आहे. सैन्य वापसीनंतर पुढील काही महत्त्वाचे निर्णय घेऊन शांतता व सद्भावनेला गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला आहे. व्यूहरचनात्मक मुत्सद्देगिरीचा विचार करता, संबंध पूर्ववत सुरळीत करणे आणि उभय देशातील संबंधांचे स्वरूप ऊबदार आणि सौहार्दपूर्ण बनविणे हा या दौऱ्याचा उद्देश होता. द्विपक्षीय संबंधात सकारात्मक रचनात्मक बदल घडविणे या उद्देशाने आखलेला हा दौरा सफल ठरला आहे. काठमांडू आणि ढाक्यानंतर परराष्ट्र सचिवांनी केलेला हा बीजिंग दौरा त्यांच्या प्रतिष्ठेत भर घालणारा ठरला आहे. चिनी शिष्टमंडळाशी उच्चस्तरीय बोलणी करून त्यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित केले आहेत.
मौलिक फलश्रुती?
विक्रम मिस्री यांच्या बीजिंग भेटीची मौलिक फलश्रुती काय असेल तर संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे प्रारंभ झाला आहे. दोन्ही देशांनी व्यावहारिक पातळीवर सहकार्य पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सीमा संबंध विस्कळीत झाल्यानंतर आता नव्याने द्विपक्षीय व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हे एक नवे पाऊल आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती परराष्ट्र धोरण ठरविणाऱ्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांचे समकक्ष उपपरराष्ट्र मंत्री सन वेइडोंग यांचीही त्यांनी भेट घेतली. पॉलीट ब्युरोच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख लिऊ जियानचाओ यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा केली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी गोठलेल्या मुद्यांबाबत महत्त्वपूर्ण सहमती संयुक्तपणे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला. परस्पर देवाण घेवाण आणि संवाद मजबूत करणे, सुधारणा आणि निरोगी मैत्रीला चालना देण्याचा विचार विनिमय दोन्ही बाजूंनी करण्यात आला. चीन-भारत संबंधांचा स्थिर विकास करणे तसेच समान चिंतेचे आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्दे हाताळणे यावर भर देण्यात आला, असे ग्लोबल टाइम्स या सरकार समर्थित चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे. 2020 साली चीनच्या घुसखोरीमुळे पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर लष्करी संघर्ष झाला होता. त्यानंतर बिघडलेले द्विपक्षीय संबंध निरोगी करण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंनी संबंध सुरळीत करण्यासाठी, परस्परांना जाणून घेण्यासाठी सकारात्मक चर्चा करून नवे वातावरण तयार करण्यावर भर दिला. दोन्ही देशामधील विमानाची थेट उ•ाणे सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत. मुत्सद्दी आणि विद्वानांना चीनचा नागरीक व्हिसा प्रदान करून निर्बंध मुक्त करणे, चिनी मोबाईल अॅप्सवरील बंदी उठविणे, चिनी पत्रकारांना भारतातून अहवाल देण्यास परवानगी देणे, भारतीय चित्रपटांना चीनमध्ये प्रदर्शनासाठी परवानगी देणे या मुद्यांवर चर्चा झाली. गलवान चकमकीनंतर परस्पर निर्बंध लावण्यात आले होते. सीमेवरील सैन्याची वापसी पूर्ण झाल्यानंतर आता संबंध सुरळीत करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात मिस्री यांच्या भेटीला महत्त्व आहे. सकारात्मक परिणामांच्या दृष्टीने हा दौरा फलदायी ठरला आहे. या उन्हाळ्यापासून कैलास मानस सरोवर यात्रा पूर्ववत सुरू करण्यासाठी चीनची संमती मिळविणे महत्त्वाचे होते. ही कैलास मानस सरोवर यात्रा भारतातील जैन धर्मीय प्रवाशांसाठी पवित्र मानली जाते. या दौऱ्यात त्यामुळे जी-20 शिखर परिषदेपासून भारत-चीन संबंधातील पुढील पावले टाकण्याचे आश्वासन चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दिले होते. 20 नोव्हेंबर 2024 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चिनी समकक्ष डोंग जून यांनी चर्चा करून संघर्षापेक्षा सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचे अभिवचन दिले होते. 11 व्या आशियान संरक्षण मंत्र्याच्या परिषदेत डोंग यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. उभय पक्षाच्या संबंधात विश्वास आणि सद्भावना निर्माण करण्यावर भर दिला होता. आता मिस्री यांच्या बीजिंग दौऱ्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. उभय देशातील सांस्कृतिक पर्यटन आणि लोक संपर्काला नवी गती मिळण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या संदर्भात जलवैज्ञानिक तपशील परस्परांना चीनने उपलब्ध करून द्यावा असे ठरविण्यात आले आहे. तसेच प्रसार माध्यमे आणि थिंक टँक दरम्यान परस्पर संवादावर भर देण्यात येणार आहे. तसेच विमान सेवा व पर्यटनाद्वारे लोक संपर्काची देवाणघेवाण शक्य होईल. 2025 हे उभय राष्ट्रातील राजनैतिक संबंधाचे 75 वे वर्ष असल्यामुळे सार्वजनिक मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना दुप्पट गती देण्यासाठी परस्परांमध्ये चांगली जागरुकता निर्माण करण्यासाठी व जनतेमध्ये परस्पर विश्वास आणि स्नेहभाव पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर