चीनच्या दौऱ्यावर जाणार विदेश सचिव
ट्रम्प यांच्या धोरणांची पार्श्वभूमी : भारत-चीन आखत आहेत नवी रणनीति
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. ट्रम्प यांच्या या नव्या कार्यकाळावर आता भारत अन् चीनच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत. याचदरम्यान विदेश सचिव विक्रम मिस्त्राr हे भारत आणि चीनदरम्यान विदेश सचिव-उपमंत्री बैठकीसाठी 26-27 जानेवारी रोजी बीजिंगचा दौरा करणार आहेत. विदेश मंत्रालयाकडून गुरुवारी यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या द्विपक्षीय व्यवस्थेच्या अंतर्गत भारत-चीन संबंध वृद्धींगत करण्यासाठी चर्चा केली जाते. यात राजनयिक, आर्थिक आणि दोन्ही देशांच्या जनतेदरम्यान संबंध वृद्धींगत करण्याचा मुद्दा सामील आहे. मागील महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांच्याशी चीन दौऱ्यादरम्यान चर्चा केली होती. 5 वर्षांच्या कालावधीनंतर सीमा मुद्द्यावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची बैठक आयोजित होणे दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान झालेली सहमती लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तसेच द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी याचे अत्यंत महत्त्व असल्याचे बैठकीदरम्यान डोवाल यांनी स्पष्ट केले होते.
कैलास मानसरोवर यात्रेवरही चर्चा
भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींच्या 23 व्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी सीमेवर सहकार्य आणि आदान-प्रदानासाठी ‘सकारात्मक दिशानिर्देश’ देण्याचाही निर्णय घेतला होता. यात कैलास मानसरोवर यात्रेची बहाली, सीमापार नद्या आणि सीमा व्यापाराचा डाटा सादर करणे सामील आहे. या बैठकीत एनएसए डोवाल आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी भाग घेतला होता.
रशियात मोदी-जिनपिंग भेट
ऑक्टोबर 2024 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान रशियातील शहर कजान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली होती. सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता आणि स्थिरतेच्या व्यवस्थापनाची देखरेख करणे आणि सीमा वादावर निष्पक्ष, योग्य आणि परस्पर स्वरुपात स्वीकारार्ह तोडगा शोधण्यासाठी बैठकांच्या अजेंड्यासंबंधी यात निर्णय घेण्यात आला होता.
ट्रम्प यांच्या निर्णयाची धास्ती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच चीनच्या उत्पादनांवर 10 टक्के आयात शुल्क लादणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ट्रम्प यांच्याकडून भारतातून आयात होणाऱ्या सामग्रीवरही वाढीव शुल्क लादले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनकडून व्यापाराच्या आघाडीवर एकत्रित रणनीति आखली जाण्याचीही शक्यता आहे.