विदेशी गुंतवणूकदारांनी 21 हजार कोटी काढले
जागतिक अस्थिर स्थितीचे कारण : बाजारही घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत आतायपर्यंत शेअरबाजारातून 21 हजार 272 कोटी रुपये काढले असल्याची माहिती आहे. पहिल्या दोन आठवड्यामध्ये ही रक्कम गुंतवणूकदारांनी काढली आहे.
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार काहीसे अस्थिर दिसून आले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीत वस्तूंवर कर लावण्याचा सपाटा सुरुच ठेवला असून परिणामी विदेशी गुंतवणूकदार सध्याला द्विधा मनस्थितीत आहेत. अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्यावर भर देत आहेत. भारतापेक्षा इतर देशातील बाजारात गुंतवणूक करण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे नजर
ट्रम्प यांनी इतर देशांवर आयातीत वस्तुंवर शुल्क जाहीर केले असून भारतासंदर्भात त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तेव्हा याबाबतच्या अस्पष्टतेचा परिणाम शेअरबाजारावर दिसतो आहे. याच दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 78,027 रुपये बाजारातून काढून घेतले होते.