For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा बनावटीचा 7 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, सापळा रचून धाड

10:30 AM May 04, 2025 IST | Snehal Patil
गोवा बनावटीचा 7 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त  सापळा रचून धाड
Advertisement

सावंतवाडीतील दोघांवर गुन्हा दाखल, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची धडक कारवाई

Advertisement

लांजा : तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीचा 7 लाख 21 हजार 400 रुपयांचा विदेशी मद्यसाठा 15 लाख रुपये किंमतीच्या हुंडाई कंपनीच्या क्रेटा कारसह जप्त केला. याप्रकरणी राजीव अंबाजी सावंत (32, रा. तांबोळी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व प्रभू साबन्ना कामनेटी (21, रा. गावडेशेत, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (), 80,81,83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिह्यामध्ये विदेशी मद्य प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार लांजा शहरात 3 मे रोजी गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन विक्री करण्याचे उद्देशाने येत आहेत.

Advertisement

त्यानुसार सापळा रचून हुंडाई क्रेटा कार (एमएच 07 एबी 1847) ची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बॉटल आढळून आल्या. यामध्ये गोल्डन एसब्ल्यू फाइन व्हिस्की 750 मिली मापाच्या प्रत्येकी 12 प्लास्टिकच्या बाटल्या असलेला एक पुठ्ठ्याचा बॉक्स याप्रमाणे एकूण 19 बॉक्स त्यांची एकूण किंमत 1 लाख 64 हजार 160 रुपये, 86 हजार 400 रुपये किंमतीचे गोल्डन एसब्ल्यू फाईन विस्की 180 मिली मापाच्या 48 सीलबंद बाटल्या असलेल्या एकूण दहा पुठ्ठ्यांचे बॉक्स, 18 हजार 240 रुपये किंमतीचे रॉयल स्टॅग सुपीरियल व्हिस्की 750 मिली मापाच्या 12 काचेच्या सीलबंद बाटल्या एकूण दोन पुठ्ठ्यांचे बॉक्स तसेच 45 हजार 600 रुपये किंमतीचे रॉयल स्टॅग सुपेरियर व्हिस्की असे 180 मापाचे 48 काचेच्या सिलबंद बाटली असलेल्या पुठ्ठ्यांचे पाच बॉक्स, 19 हजार 200 रुपये किंमतीचे रिझर्व 7 रेअर व्हिस्की 750 मापाच्या 12 काचेच्या सिलबंद बाटल्या असलेले दोन पुठ्ठ्यांचे बॉक्स सापडले.

तसेच 8640 रुपये किंमतीचे मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की असे 750 मिली मापाच्या 12 काचेच्या सिलबंद बाटल्या पुठ्ठ्याचा एक बॉक्स, 25 हजार 920 रुपये किमतीच्या मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की 180 मिली मापाच्या 48 काचेच्या सिलबंद बाटल्या असलेल्या एक पुठ्ठ्याचा बॉक्स, 1 लाख 22 हजार 880 रुपये किंमतीचे हायवर्ड फाईन व्हिस्की 180 मिली मापाच्या 48 बाटल्या असलेला एक बॉक्स असे 16 पुठ्ठ्याचा बॉक्स. तसेच 2 लाख 30 हजार 400 रुपये किंमतीच्या हायवर्ड फाईन व्हिस्की 750 मिली मापाच्या 12 प्लास्टिकचा सिलबंद बाटल्या असलेल्या बॉक्स असे 20 पुठ्ठ्यांचे बॉक्स आणि 15 लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार असा एकूण 22 लाख 21 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

अधिक तपास लांजा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत. कारवाई पथकामध्ये स. पो. फौ. सुभाष भागणे, पोलीस हवालदार प्रवीण खांबे, पोलीस हवालदार गणेश सावंत, पोलीस हवालदार अमित कदम, पोलीस हवालदार विक्रम पाटील, पोलीस हवालदार विजय अंबेकर, पोलीस हवालदार सत्यजीत दरेकर व चा. पो. शी अतुल कांबळे यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.