विदेशी अतिथींनी भेटण्यापासून रोखले जातेय!
विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप : ब्लादिमीर पुतीन यांच्या भेटीची संधी नाही
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर नवा आरोप केला. विदेशी अतिथींना विरोधी पक्षनेता भेटण्याची परंपरा राहिली आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे पालन करत नसल्याने त्यांची असुरक्षितपणाची भावना उघड होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व आम्ही देखील करतो, केवळ सरकार करत नसल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. जेव्हा एखादा विशिष्ट विदेशी अतिथी भारतात येतो, किंवा मी विदेशात जातो तेव्हा सरकारकडून माझ्यासोबत (राहुल गांधी) भेट होऊ नये असे बजावण्यात येते. तर विदेशी अतिथी जेव्हा भारतात येतात, तेव्हा त्यांची भेट विरोधी पक्षनेत्यासोबत घडत असते, ही सर्वसाधारणपणे परंपरा राहिली असल्याचे राहुल गांधी यांनी संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
सरकारकडून दरवेळी कृत्य
अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात तसेच मनमोहन सिंह यांच्या शासनकाळात या परंपरेचे पालन केले जात होते. परंतु आता जेव्हा विदेशातून एखादा महनीय भारतात आल्यास किंवा मी विदेशात गेल्यास सरकार विदेशी अतिथी किंवा विदेशातील लोकांना माझी भेट न घेण्याची सूचना करत आहे. सरकार दरवेळी हे कृत्य करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व
हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व आम्ही देखील करतो, केवळ सरकार करत नाही. विरोधी पक्षांचे नेते विदेशी अतिथींना भेटावेत अशी सरकारची इच्छा नाही. मोदी सरकार यासंबंधीच्या परंपरेचे पालन करणे टाळत आहे. विदेश मंत्रालय याकडे दुर्लक्ष करत असून हा प्रकार असुरक्षिततेची भावना दर्शविणारा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तर अशाप्रकारच्या गाठीभेटींचा निर्णय विदेशी प्रतिनिधिमंडळांकडून घेतला जात असतो. यात सरकारचा कुठल्याही प्रकारे सहभाग नसतो असे स्पष्टीकरण देत सरकारी सूत्रांनी राहुल गांधींचा आरोप फेटाळला आहे.
मत व्यक्त करण्याचा अधिकार : वड्रा
सर्व विदेशी महनीय भारतात आल्यावर विरोधी पक्षनेत्याला भेटत असतात, यासंबंधी एक प्रोटोकॉल असतो. परंतु सरकार या प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असून सरकारची सर्व धोरणे यावरच आधारित आहे. कुणीही स्वत:चा आवाज उठवू नये अशी सरकारची इच्छा आहे. याचमुळे सरकार अन्य कुणाचे मत ऐकून घेत नाही. सरकारने लोकशाहीच्या प्रोटोकॉलचे पालन करायला हवे. मोदी सरकारला नेमकी कशाची भीती आहे हे देवालाच ठाऊक. लोकशाहीत सर्वांना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार असायला हवा, चर्चा व्हायला हवी आणि योग्य कारवाई व्हावी. सरकार असुरक्षित असून हा निर्णय त्याचेच प्रतिबिंब आहे. विदेशी अतिथींच्या दौऱ्यासंबंधीच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करून सरकार नेमकं काय साध्य करू पाहत आहे? अशाप्रकारच्या निर्णयांमुळे भारतीय लोकशाहीच्या प्रतिमेला जगात धक्का पोहोचल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांनी केला आहे.