विदेशी चलन साठा 709 अब्ज डॉलर्सवर
रिझर्व्ह बँकेची माहिती : सुवर्ण साठ्यातही वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारीच्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा नव्या विक्रमावर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अलीकडेच दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 23 जानेवारी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 709.41 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सुवर्ण साठा व विदेशी चलन संपत्तीत झालेली वृद्धी यामुळे विदेशी चलन साठा आठवड्यात 8 अब्ज डॉलर्स इतका वाढलेला दिसून आला. याआधी 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठ्याने 705 अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. गेल्या दीड वर्षांमध्ये पाहता जागतिक स्तरावरती अस्थिरतेमुळे रुपयावर दबाव पाहायला मिळाला. जागतिक पातळीवर विविध देशांची युद्धे, अमेरिकेकडून भारतासोबतचा रखडलेला व्यापार करार, या विचीत्र परिस्थितीतही रिझर्व्ह बँकेने आक्रमक रूप धारण करत विदेशी चलन बाजारामध्ये हस्तक्षेप करत स्थिती बऱ्यापैकी सावरली.
याचदरम्यान 23 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा सुवर्ण साठा 5.64 अब्ज डॉलर्सने वाढून 23 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.