विदेशी चलन साठा 700 अब्ज डॉलर्सवर
रिझर्व्ह बँकेची माहिती : चलनसाठ्यात चौथा मोठा देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये सलग सातव्या आठवड्यात तेजी पहायला मिळाली. पहिल्यांदाच विदेशी चलनसाठा 700 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील माहिती दिली आहे. भारत 700 अब्ज डॉलर्स इतक्या विदेशी चलनसाठ्यासह जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे. चीन, जपान आणि स्वीत्झर्लंड हे तीन देश विदेशी चलनसाठा करण्यात सध्याला पाहता अग्रक्रमावर आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलनसाठा 12.6 अब्ज डॉलर्सने वाढून 704.89 अब्ज डॉलरवर पोहोचला.
विदेशी गुंतवणूक वाढतीच
जुलै 2023 नंतर पाहता विदेशी चलनसाठ्याची ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे. 2013 मध्ये देशात आर्थिक कठीण परिस्थितीमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे चलनसाठा त्यावर्षी कमालीचा घटला होता. परंतु सध्याच्या काळात अर्थव्यवस्था बऱ्यापैकी प्रगतीपथावर असून कमी वित्तीय तुटीमुळे विदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत, असे दिसून येते आहे.