विदेशी कंपन्या संयुक्तपणे ‘हल्दीराम’ करणार खरेदी
कंपनीचा 76 टक्के हिस्सा खरेदी करण्यास 70 हजार कोटींची बोली
नवी दिल्ली :
एका जागतिक गुंतवणूक गटाने देशातील लोकप्रिय स्नॅक्स कंपनी हल्दीराममधील 76 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी 8.5 अब्ज डॉलर (सुमारे 70 हजार कोटी) ची नॉन-बाइंडिंग बोली सादर केली आहे. अहवालानुसार, अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण आणि जीआयसी सिंगापूरसह खासगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखालील संघाने भाग खरेदी करण्यासाठी बोली सादर केली आहे. मात्र, यासंदर्भात हल्दीराम आणि संघाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हा भारतातील सर्वात मोठा खासगी इक्विटी करार असू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर हा करार झाला तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा खासगी इक्विटी करार असेल. एचएसएफपीएल हा अग्रवाल कुटुंबाच्या दिल्ली आणि नागपूर समूहाचा एकत्रित पॅकेज्ड आणि स्नॅक्स फूड व्यवसाय आहे.
स्नॅक मार्केटचा 13 टक्के हिस्सा, 1937 मध्ये सुरू झाला. युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारताच्या 6.2 बिलियन डॉलर स्नॅक्स मार्केटमध्ये हल्दीरामचा सुमारे 13 टक्के हिस्सा आहे. लेस चिप्ससाठी प्रसिद्ध असलेल्या पेप्सीचा देखील जवळपास 13 टक्के वाटा आहे. हल्दीरामचे फराळाचे पदार्थ सिंगापूर आणि अमेरिकेसारख्या परदेशी बाजारपेठेतही विकले जातात. कंपनीची अंदाजे 150 रेस्टॉरंट आहेत. 1937 मध्ये एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात झाली होती.